भावाच्या गर्भवती बायकोचाही विचार नाही केला, तिच्यासह लहान भावाला बांबूने बेदम मारलं आणि…

दोन मोठ्या भावांनी लहान भावाला बांबूने बेदम मारलं, पण भर रस्त्यात त्याच्या बायकोचं मंगळसूत्र तोडलं आणि... घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ... तीन भावांमधील वाद पोहोचला पोलीस स्थानकात...

भावाच्या गर्भवती बायकोचाही विचार नाही केला, तिच्यासह लहान भावाला बांबूने बेदम मारलं आणि...
फाईल फोटो
Updated on: Oct 25, 2025 | 2:09 PM

Crime in Dombivli  : अनेक ठिकाणी आपण भावंडांमध्ये असलेलं प्रेम पाहतो… पण अनेक ठिकाणी सख्खे भाऊ एकमेकांचे पक्के वैरी असतात. सख्ख्या भावांमध्ये कधी संपत्तीवरून वाद होतो, तर कधी आई – वडीलांना संभांळण्यावरुन… वाद असतात… आता देखील तीन भावांचे वाद पोलिसांपर्यंत पोहोचले आहेत. दोन भावांकडून लहान भावावर हल्ला करण्यात आला.एवढंच नाही तर, गर्भवती पत्नीलाही भर रस्त्यावर मंगळसूत्र तोडत बेदम मारहाण केली. घराच्या किरकोळ वादातून बांबू आणि दगडाने भावाला मारहाण केली. शिवाय पायाचं नख उपटल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे.

काय आहे संपूर्ण घटना….

डोंबिवलीतील गोळवली परिसरात सणासुदीच्या काळात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दिवाळीच्या दिवशी बाजारातून खरेदी करून घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर स्वतःच्या सख्या दोन भावांनी हल्ला केला. भावाच्या गर्भवती बायकोला धक्काबुक्की करत तिचं मंगळसूत्र तोडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मानपाडा पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपी भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेतील गोळवली गावातील चिंधी गल्लीजवळील महाळुबाई बंगल्यासमोर मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार भरत तुळशीराम पाटील (वय 37) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी निमित्त पत्नीसह बाजारात खरेदी करून घरी परतल्यावर अचानक त्यांचे सख्खे भाऊ सिताराम तुळशीराम पाटील आणि नितीन तुळशीराम पाटील यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

भरत तुळशीराम पाटील यांनी दिलेल्या पुढील माहितीनुसार, “घरी पोहोचताच सिताराम माझ्याकडे आला आणि काहीही कारण नसताना माझ्या कानशिलात मारली. मी विचारणा केली तरी त्याने ऐकलं नाही. काही क्षणांतच नितीन हातात बांबू घेऊन आला आणि माझ्या सर्व अंगावर फटके मारले. सितारामने दगड घेऊन डोक्यावर प्रहार केला. एवढंच नाही तर त्याने माझ्या पायाचं नख उपटलं. ज्यामुळे मला प्रचंड वेदना झाल्या..

दोन्ही भाऊ मारहाण करत असताना, भरत यांची पत्नी, पती वाचवण्यासाठी आली. मात्र आरोपी भावांनी तिच्यावरही धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढंच नाही तर, तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून टाकलं. या घटनेनंतर भरत पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही आरोपी भावांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ बनसोडे करत आहेत.