
Up Crime News : उत्तर प्रदेशमधील कासगंज येथे चोरीचा एक अजब प्रकार मसोर आला आहे. येथे एका चोराने चक्क अंतर्वस्त्र (अंडरविअर) परिधान करून एका रॉडच्या मदतीनेत तब्बल आठ लाख रुपयांची चोरी केली आहे. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरी करण्यासाठी चोरटा छतावरून थेट दुकानात घुसरला. त्यानंतर त्याने चोरी केली.
ही घटना समोर आल्यानंतर अंतर्वस्त्रांवर चोरी करणाऱ्या टोळीची कासगंजमध्ये दहशत माजली आहे. चोरी झालेल्या दुकानमालकाने याबाबत तक्रार केली असून पोलिसांनी आपला तपास चालू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरीचा हा प्रकार कासगंज येथील ठंडी सडक या भागात घडला आहे. या भागात मोहम्मद हारून या व्यक्तीचे बॅटरी इन्व्हर्टरचे दुकान आहे. ते एक होलसेल व्यापारी आहेत. हारुन यांच्यानुसार त्यांनी सकाळी त्यांचे दुकान नेहमीप्रमाणे चालू केले होते. मात्र दुकानात प्रवेश करताच सामान अस्तव्यस्त पडल्याचे त्यांना दिसले. काऊंटरवर जाऊन त्यांनी पैसे ठेवण्यासाठी असलेले ड्रॉवर उघडून पाहिले. त्यातील आठ लाख रुपयांची रोकड चोरीला गेलेली होती. पैसे चोरीला गेल्याचा पाहून हारून घाबरून गेले. त्यांनी लगेच सीसीटीव्ही चेक केले. यात पैसे चोरणारा चोर दिसत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा सर्व प्रकार कैद झाला आहे. या फुटेजनुसार एक चोर अंडरविअरवर शिड्यांच्या मदतीने दुकानात शिरला. त्याच्या हातात एक लोखंडी रॉड होता. त्याने दुकानातील पैसे ठेवलेले ड्रॉवर पाहिले. ड्रॉवरचे लॉक तोडून त्याने नोटा उचलल्या. त्यानंतर चोर सर्व पैसे घेऊन आरामात निघून गेला. त्याने तब्बल आठ लाखांची चोरी फक्त दोन मिनिटांत केली.
दरम्यान, चोरी झालेली समजताच फक्त अंतर्वस्त्रांवर चोरी करणाऱ्या चोरांचा शहराने धसका घेतला आहे. सध्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी आपला तपास चालू केला आहे. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोराला पकडावे, अशी मागणी केली जात आहे.