Yashashri Shinde : दाऊदला अटक होताच यशश्री शिंदे हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती आली समोर

Yashashri Shinde : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आलीय. आरोपीला आज सकाळीच पोलिसांनी कर्नाटक गुलबर्गा येथून अटक केली. यशश्री गुरुवारपासून बेपत्ता होती. शुक्रवारी तिचा मृतदेह उरण कोटनाका येथे एका पेट्रोल पंपाजवळ आढळला. ही हत्या का झाली? हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

Yashashri Shinde : दाऊदला अटक होताच यशश्री शिंदे हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती आली समोर
Yashashri Shinde murder case
| Updated on: Jul 30, 2024 | 12:06 PM

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मुख्य संशयित दाऊद शेखला आज सकाळी पोलिसांनी अटक केली. कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर आता या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. “आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलं. मोहसीन यशश्रीच्या संपर्कात होता. सर्वांची चौकशी करतोय. कुठलाही अँगल सोडायचा नाहीय. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली, त्याने कबुली दिली” असं उरण पोलीस म्हणाले. हत्येचं कारण काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर पोलीस म्हणाले की, “यशश्रीची आरोपी बरोबर ओळख होती. तीन-चार वर्षांपासून आरोपी यशश्रीच्या संपर्कात नव्हता. त्यातून त्याने हा गुन्हा केल्याचा संशय आहे”

चार वर्षापूवी यशश्रीच्या प्रकरणातच आरोपीवर पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला होता, त्यातून त्याने हे केलय का? त्यावर पोलीस म्हणाले की, “आरोपीची अजून पूर्ण चौकशी झालेली नाही. त्यातून आताच असं सांगणं घाईच ठरेल” शव विच्छदेन अहवालाबद्दल पोलीस म्हणाले की, शरीरावर जखमा या वार केल्यामुळे झाल्या आहेत. पण मृताचा चेहरा कुत्र्यांनी खराब केल्याची शक्यता आहे.

यात किडनॅपिंग आहे का?

यात किडनॅपिंग आहे का? या प्रश्नावर पोलीस म्हणाले की, “दोघांचा संपर्क झाला. दोघांनी भेटायच ठरवलं. दोघे ओळखत होते. यात किडनॅपिंग नाहीय” तिथे वाद झाला असावा, त्यातून हे घडल्याची शक्यता आहे. दोघे ठरवून भेटल्याच पोलिसांनी सांगितलं.

यशश्री घरी काय सांगून बाहेर पडलेली?

यशश्री एका खासगी कंपनीत नोकरीला होती. कॉर्मस शाखेतून तिने पदवी घेतलेली. गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत, असं तिने तिच्या पालकांना सांगितलं. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही, त्यावेळी तिच्या वडिलांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

मृतदेह कुठे सापडला?

शुक्रवारी रात्री उशिरा उरण कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ एका निर्जन रस्त्यावर यशश्रीचा मृतदेह आढळून आला. अत्यंत निर्घृणपणे यशश्रीची हत्या करण्यात आली होती. मृतदेहावर सर्वत्र रक्त होतं. शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या.

Follow Us