लग्नाच्या मंडपात मृत्यूचं थैमान, तंदूर रोटीसाठी तुफान भांडणं; नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे असाच एक भयंकर आणि अचंबित करणारा प्रकार घडला आहे. इथे चक्क तंदुरी रोटीसाठी तुफान भांडणं झाले आहेत.

लग्नाच्या मंडपात मृत्यूचं थैमान, तंदूर रोटीसाठी तुफान भांडणं; नेमकं काय घडलं?
tandoor roti (फोटो सौजन्य- मेटा एआय)
| Edited By: | Updated on: May 04, 2025 | 7:31 PM

Uttar Pradesh Crime News : कधी कोणत्या मुद्द्यावरून भांडण होईल, हे सांगता येत नाही. अनेकदा तर एखाद्या क्षुल्लक कारणामुळे काही लोक एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत मजल मारतात. उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे असाच एक भयंकर आणि अचंबित करणारा प्रकार घडला आहे. इथे चक्क तंदुरी रोटीसाठी तुफान भांडणं झाले आहेत. विशेष म्हणजे या भांडणात चक्क दोघांचा मृत्यू झालाय.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार अमेठीतील एका विवाहसोहळ्यात हा प्रकार घडला आहे. या भांडणात दोघांचा मृत्यू झाला आहे. तंदुरी रोटी अगोदर घेण्यावरून हा वाद झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तर दुसरीकडे लग्नाच्या मंडपात मृत्यूतांडव झाल्यामुळे सगळीकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे.

भांडण कसे झाले होते?

अमेठीतील जामो ठाण्यातील बलभद्रपूर गावात ही घटना घडली आहे. या गावात रामजियावन वर्मा यांच्या घरात लग्नसोहळा होता. वराची वरात येईपर्यंत सर्वकाही व्यवस्थित होतं. सगळे लोक लग्नाची तयारी करत होते. या लग्नसोहळ्यात पाहुण्यांच्या जेवणाला सुरुवात झाली. जेवण बनवणाऱ्यांनी समोर भरपूर साऱ्या तंदुरी रोटी ठेवल्या होत्या. यातील तंदुरी रोटी घेण्यावरून रवी कुमार उर्फ लल्लू आणइ आशिष कुमार यांच्यात भांडण चालू झाले.

एकाचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

हा वाद नंतर एवढा वाढला की दोघांनीही एकमेकांना लठ्याकाठ्याने मारलं. या मारामारीत दोघेही गंभीर जखमी झाले. या संपूर्ण भांडणात आशिष वर्माचा जागेवरच मृत्यू झाला. तर रवीचा लखनौ येथे उपचार करत असताना मृत्यू झाला. दे दोन मृत्यू समोर आल्यानंतर दोन्ही कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.