पोलिसांचा पिच्छा सोडवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली, जखमी आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

| Updated on: Feb 14, 2023 | 9:22 AM

इमरान हा नागपूरच्या कपिल नगर परिसरातल्या म्हाडा क्वार्टरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस रविवारी म्हाडा क्वार्टर्समध्ये पोहोचले.

पोलिसांचा पिच्छा सोडवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली, जखमी आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू
पोलिसांना पाहून तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या आरोपीचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर / गजानन उमाटे (प्रतिनिधी) : पोलीस पाठलाग करीत असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झालेल्या एका आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली. नागपूर जिल्ह्यातील देवलापारमध्ये ही घटना घडली. इमरान शेख असे मयत आरोपीचे नाव आहे. अनेक दिवसापासून आरोपीचा ग्रामीण पोलीस शोध घेत होते. गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये जनावरांची तस्करी करण्याच्या प्रकरणात इमरान शेखवर देवलापार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी म्हाडा क्वार्टर्समध्ये लपल्याची माहिती मिळाली होती

इमरान हा नागपूरच्या कपिल नगर परिसरातल्या म्हाडा क्वार्टरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस रविवारी म्हाडा क्वार्टर्समध्ये पोहोचले. पोलीस आल्याचे दिसताच इमरान शेख याने तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्याचे नागपूर झोन 5 च्या पोलीस उपायुक्त श्रावण दत्ता यांनी सांगितले.

जखमी आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

या घटनेत इमरान जखमी झाला होता, त्याला नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांच्या कारवाईमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

या प्रकरणात इमरान शेख यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईमुळे इमरानचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. इमरानच्या नातेवाईकांच्या आरोपाची चौकशी केली जाईल, असे नागपूर पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

औषधाची बाटली तोंडात घातल्याने चिमुरडीचा मृत्यू

मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपुरच्या सक्करदरा परिसरात घडली आहे. खेळत असताना मुलीच्या हाती मच्छर मारण्याच्या औषधीची बाटली लागली. तिने तोंडात घातल्यामुळे ती बेशुद्ध पडली.

तासाभराने तिची आई बेडरुममध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वडिलांनी रिद्धीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन तासांनंतर मुलीचा मृत्यू झाला. सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.