
इंदूरमधील राजा रघुवंशी हनीमूनला गेलेला असताना त्याची निर्घृण हत्या करण्यात ली. याच प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यासह 8 आरोपींना या प्रकरणात आतापर्यंत अटक केली आहे. तरीही पोलिस या प्रकरणातील सर्व पुरावे शोधत आहेत ज्यामुळे हा खटला अधिक मजबूत होऊ शकतो. याच दरम्यान, आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी सोनमची दोन मंगळसूत्रे जप्त केल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही मंगळसूत्रांच्या शोधामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोनमने राजाशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न केले होते का? जर एक मंगळसूत्र राजाच्या नावे असेल तर दुसरं कोणाचं आहे? असे प्रश्न सध्या पडले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजाच्या हत्येनंतर सोनम ज्या फ्लॅटमध्ये लपली होती तिथून पोलिसांना ही दोन्ही मंगळसूत्रे सापडली. यातील एक मंगळसूत्र राजाने तिला लग्नानत घातलं होतं तर दुसरं मंगळसूत्र हे तिचा प्रियकर, राजने दिले होते असे सांगितले जात आहे. त्यामुळे राजाशी लग्न करण्यापूर्वी सोनमने राजशी गुप्तपणे लग्न केले होते का ? हे पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, सोनमच्या लग्नाच्या वेळी राजाच्या कुटुंबाने भेट म्हणन दिलेल्या 16 लाख रुपयांच्या दागिन्यांबद्दलही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
राजाच्या हत्येनंतर सोनमची काळी बॅग चोरणाऱ्या शिलोम जेम्सने दिलेल्या माहितीनंतर, इंदूर पोलिसांनी नुकतेच रतलाम येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरातून दागिने जप्त केले. परंतु दागिने शाबूत आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राजाच्या भावाकडून अनेक खुलासे
या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनमला तिच्या लग्नात रघुवंशी कुटुंबाने सुमारे 16 लाख रुपयांचे दागिने भेट म्हणून दिले होते असे राजा रघुवंशीच्या मोठ्या भावाने सोमवारी सांगितले. रविवारी मध्य प्रदेशातील रतलाम येथून मेघालय पोलिसांनी काही दागिने, लॅपटॉप आणि इतर साहित्य महत्त्वाचे पुरावे म्हणून जप्त केल्यानंतर बिपिन रघुवंशी यांनी हा दावा केला आहे. इंदूरमधील रिअल इस्टेट व्यावसायिक शिलोम जेम्स यांनी दिलेल्या माहितीवरून त्याच्या पत्नीच्या माहेरी घरातून या वस्तू जप्त करण्यात आल्या, जेम्सयाला हत्येचे पुरावे लपवल्याच्या आणि नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या वसूलीच्या दुसऱ्या दिवशी, बिपिन रघुवंशी हा इंदूर पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या कार्यालयात हजर झाला, तिथेच मेघालय पोलिसांचे पथक तपासासाठी तळ ठोकून होते.
दागिन्यांचे मागितले फोटो
राजाचा भाऊ विपिनने सांगितले की, राजा आणि सोनमच्या लग्नात त्याच्या कुटुंबाने त्यांच्या सुनेला भेट म्हणून दिलेल्या सुमारे 16 लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे फोटो त्याने मेघालय पोलिसांना दिले आहेत. मला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मेघालय पोलिसांच्या पथकाने राजा आणि सोनमच्या लग्नाशी संबंधित दागिन्यांचे फोटो मागितले. सध्या मला माहित नाही की यापैकी कोणते दागिने जप्त केले आहेत, असे राजा रघुवंशी यांच्या मोठ्या भावाने सांगितले.
आई राजाला ओरडली होती
विपिनने असेही सांगितले की मेघालयला हनिमूनसाठी जाताना त्याचा भाऊ राजा हा सोन्याची चेन आणि अंगठी घालून मेगेला होता. हनिमूनला जाताना विमानतळावर काढलेले फोटो राजाने आम्हाला पाठवले होते. मात्र ते फोटो पाहिल्यानंतर, माझ्या आईने राजाला फोनवर फटकारले. हनिमूनला जाताना इतके महागडे दागिने घा त्यालून का जातोय, असंही आईने त्याला विचारलं होतं. त्यावर राजा म्हणाला की, सोनमने त्याला हनिमून दरम्यान हे दागिने घालायला सांगितले होते, अशी माहिती त्याच्या भावाने दिली.
23 मे ला झाली हत्या
मेघालयात हनिमूनसाठी आलेल्या राजा रघुवंशीची 23 मे रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी त्याची पत्नी सोनम, तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि कुशवाहाचे तीन मित्र – विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी – यांना आधीच अटक करण्यात आली आहे. तर हत्येचे पुरावे लपवणे आणि ते नष्ट केल्याच्या आरोपाखाली रिअल इस्टेट व्यावसायिक जेम्ससह तिघांना अटक करण्यात आली आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जेम्सला मध्य प्रदेशात आणले आहे.