Sanjay Biyani Murder: दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले बिल्डर संजय बियाणी कोण आहेत?

| Updated on: Apr 05, 2022 | 7:16 PM

Who is Sanjay Biyani : त्या करण्यात आलेल्या संजय बियाणी यांच्या प्रसिद्ध होण्यामागचं नेमकं कारण काय आहेत? त्यांची सुरक्षा का काढण्यात आली? बियाणी यांना धमकावणारे लोकं कोण होते?

Sanjay Biyani Murder: दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले बिल्डर संजय बियाणी कोण आहेत?
कोण आहेत संजय बियाणी?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : संपूर्ण नांदेड हत्येच्या (Nanded Sanjay Biyani Murder) घटनेनं हादरलं! प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांडामुळे नांदेडमधील संपूर्ण बांधकाम क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, हत्या करण्यात आलेल्या संजय बियाणी यांच्या प्रसिद्ध होण्यामागचं नेमकं कारण काय आहेत? त्यांची सुरक्षा का काढण्यात आली? बियाणी यांना धमकावणारे लोकं कोण होते? कुणी त्यांच्याकडे खंडणी मागितली होती? असे अनेक प्रश्न यानमित्तानं उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, संजय बियाणी नेमके कोण आहेत? (Who is Sanjay Biyani) हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. नांदेडमधील काँग्रेसचे मोठे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनीही या हत्येची गंभीर दखल घेतली आहे. एका उमद्या व्यावसायिकाच्या हत्येमुळे सामाजिक क्षेत्रातील तरूण सहकारी गमावल्याचे दुःख झाल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

कोण होते बिल्डर संजय बियाणी?

  1. नांदेडच्या नायगांव तालुक्यातील कोलंबी गावातील रहिवाशी असलेले संजय बियाणी यांनी सुरुवातीला केबल व्यवसायातून उद्योगाला सुरुवात केली. त्या नंतर त्यांनी रिअल इस्टेट मध्ये त्यांनी प्रवेश केला.
  2. नांदेडकरांना स्वस्तात फ्लॅट देणारे बिल्डर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. साधारणतः पंधरा वर्षांपासून त्यांनी या व्यवसायात घट्ट पाय रोवले होते.
  3. शहरातील अनेक भागात इमारती उभ्या करत त्यांनी लोकांना फ्लॅटची विक्री केली.
  4. तत्काळ बांधकाम आणि ग्राहकांना ताबा देण्याच्या त्यांच्या सचोटीमुळे ते अल्पावधीतच मोठे बिल्डर बनले. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपल्या समाजातील 73 कुटूंबाना स्वस्तात घरे दिल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.

का करण्यात आली हत्या?

  1. संजय बियाणी यांना त्यांच्या बांधकाम व्यवसायातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागल्याने खंडणी बहाद्दर गुंडाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या.
  2. त्यातून खंडणीची मागणीसाठी त्यांना दोन वर्षांपूर्वी धमकीचे फोन आले होते. बियाणी यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना सुरक्षारक्षक ही दिला होता.
  3. मात्र गेल्यावर्षी पोलिसांनी त्यांचा सुरक्षा रक्षक काढून घेतला होता. त्यानंतर आज बियांणी यांची हत्या झाल्याने नांदेडमध्ये खळबळ उडालीय.

लोकप्रिय का झाले बियाणी?

संजय बियाणी हे सामाजिक उपक्रमात कायम अग्रेसर असायचे. विविध सेवाभावी संस्था आणि संघटनांना ते सढळ हस्ते मदत करत असत. त्या सोबतच ग्राहकांशी त्यांचं वर्तन अत्यंत नम्रतेचं असायचे. त्यामुळे बांधकामासारख्या रुक्ष क्षेत्रात राहूनही ते नांदेडमध्ये कायम चर्चेत असत.

अशोक चव्हाण यांचं ट्वीट :

मयत संजय बियाणी यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत,. दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. बियाणी यांच्यावर बुधवारी सकाळी दहा वाजता गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे कुटुंबाने कळवलं आहे.

हत्येचं सीसीटीव्हीही समोर!

दरम्यान, संजय बियाणी यांच्या हत्येचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. संजय बियाणींवर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांनी तातडीनं रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.