
मुंबई : ठाण्यामध्ये चॉपर गँग सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. आझाद नगरमध्ये रात्रीच्या वेळी हॉटेल व्यावसायिक आणि वेटरवर चॉपरने हल्ला करण्यात आलाय. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ठाण्यामध्ये आता कोयता गँगनंतर चॉपर गँग सक्रिय झाली असल्याचं दिसत आहे.
ठाण्यामधील ब्रह्मांड आझाद नगरमध्ये सागर गोल्डन हॉल टॉप नावाच्या हॉटेलमध्ये रात्री 11.30 वाजताच्या सुमारास हा राडा झालेला पाहायला मिळाला. आरोपी ओंकार भोसले, अभि पाटील आणि त्याचा मित्र हॉटेलमध्ये बसले होते. तिघांनी ऑर्डर दिली मात्र ऑर्डर यायला काही वेळ लागला. आरोपींनी त्यानंतर टेबल उलटा करून नुकसान करायला सुरूवात केली.
ऑर्डरला उशिरा झाला म्हणून रागाच्या भरात आरोपींनी वेटरवर त्यासोबत हॉटेल व्यावसायिकावरही थेट चॉपरने हल्ला केला. भर रात्री हल्ला करून आरोपी पसार झाले. आरोपी पसार झाले असून कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चुकून जर तो चॉपर वेटर किंवा हॉटेल व्यावसायिकाच्या मानेवर बसला असता तर जाग्यावरच त्यांना आपला जीव गमवावा लागला असता.
दरम्यान, या सर्व प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आरोपी क्रूरपणे हातातील चॉपर वेटर आणि हॉटेल व्यावलायिकावर चालवत आहे. राजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्याचं या प्रकरणातून दिसून आलं आहे.