‘मुस्कान पार्ट 2’, तरुणीने पतीची हत्या करून छोटे-छोटे तुकडे केले; बॅगमध्ये भरून डोंगरावरून खाली फेकले, शहर हादरलं
मेरठचं मुस्कान प्रकरण चांगलंच गाजलं होतं. मुस्कानने आपला प्रियकर साहिलच्या मदतीनं पती सौरभ राजपूत याची हत्या केली होती, आता असंच एक प्रकरण समोर आलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

मेरठचं मुस्कान प्रकरण चांगलंच गाजलं होतं. मुस्कानने आपला प्रियकर साहिलच्या मदतीनं पती सौरभ राजपूत याची हत्या केली, त्यानंतर त्याचा मृतदेह एका मोठा निळ्या ड्रममध्ये टाकून त्यावर सिमेंट ओतलं होतं, आता असंच एक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. ही घटना जम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये घडली आहे. एका महिलेनं आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर तिने आधी आपल्या पतीचा मृतदेह जाळला, त्यानंतर त्याच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे केले, हे तुकडे तिने प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरले आणि ही बॅग तिने डोंगरावरून खाली फेकली. धक्कादायक म्हणजे या घटनेत या महिलेचा कोणी प्रियकर नव्हता, या घटनेत कोणताही प्रेमाचा अँगल समोर आलेला नाहीये, तर या प्रकरणात या महिलेच्या आईने आणि भावानेच तिला साथ दिली, तिने आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीची हत्या केली.
नेमकं काय आहे प्रकरण?
उधमपूरच्या चनौनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये एक बॅग आढळून आली, ही बॅग अनेक दिवसांपासून दगडांमध्ये पडलेली होती. त्यामुळे तिच्यावर फार कोणाचं काही लक्ष गेलं नाही, मात्र जेव्हा या बॅगमधून दुर्गंध येऊ लागला तेव्हा लोकांचं या बॅगकडे लक्ष गेलं, याची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी जेव्हा ही बॅग तपासली तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला या बॅगमध्ये मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
तपासाला सुरुवात केल्यानंतर प्राथमिक तपासामध्ये हा मृतदेह रवि कुमार नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांना त्याच्या पत्नीचा संशय आला, पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली, मात्र त्यानंतर पोलिसांनी तिची अधिक चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रवि कुमार हा उधमपूरमधील एका छोट्या खेडेगावात राहात होता, ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी तो आपल्या सासरवाडीला गेला होता, तिथेच त्याच्या पत्नीने आपली आई आणि भावाच्या मदतीनं त्याची हत्या केली, त्यानंतर त्याच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे करून ते बॅगमध्ये भरले आणि बॅग डोंगरावरून फेकली.
