
देशाची राजधानी असलेली नवी दिल्ली सध्या वाढत्या गुन्ह्यांमुळेही चांगलीच चर्चेत आली आहे. दिल्लीच्या डाबरी भागातून एका असा भयानक प्रकार समोर आलाय, की ते ऐकून भलेभले कापायला लागले. 21 ऑगस्टला रुपा नावाची तरूणी अचानक गायब झाली आणि दोन दिवसांनी एका नाल्यात थेट तिचा मृतदेह सापडला. पण याचा तपास करताना जे सत्य उघड झालं त्याने फक्त तिचे नातेवाईक नव्हे तर पोलिसही हादरले. आरोपी दुसरा-तिसरा कोणी नव्हे तर तोच टेवर होता, ज्याला रुपा नेहमी भेटायची. पैशांच्या वादातून त्याने तिचा खूनच केला …
23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजून 54 मिनिटांनी डाबरी पोलिस स्टेशनला पीसीआर कॉल आला. एका तरुणीचा मृतदेह नाल्यात पडल्याची माहिती फोन करणाऱ्याने दिली. ते ऐकून पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठलं आणि तिचा मृतदेह ताब्यात घेतला. मृत महिलेच्या हातावरील टॅटूवरून तिची ओळख पटली. बिंदापूरमध्ये राहणाऱ्या रुपा नावाच्या तरूणाचा हा मृतदेह असल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे तिच्या आईने त्याच दिवशी आपली मुलगी हरवली असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.
CCTV मुळे गुन्ह्याची उकल
याप्रकरणाचा तपास सुरू केल्यावर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सर्व CCTV खंगाळून काढले, त्यातलं फुटेज तपासलं. त्यातील एका व्हिडीओत स्पष्टपणे दिसलं की रुपा एका इमारतीत शिरत होती आणि तिच्यासोबत 35 वर्षांचा सलमीही होता. तो डाबरीच्या महावीर एन्क्लेव्हमध्ये रहायचा पण मूळचा तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्यानंतर काही तासांनी त्याच सीसीटीव्हीमध्ये सलीम बाहेर येताना दिसला. पण त्याच्या हातात एक मोठं पॅकेट होतं, ज्यामध्ये त्याने रुपाचा मृतदेह लपवून बाहेर आणला.
पैशांच्या वादामुळे घेतला जीव
पोलिस तपासात अशी माहिती समोर आली की, रूपा आणि सलीम एकमेकांच्या संपर्कात होते. दोघेही वेळोवेळी भेटत असत. पण अलिकडेच दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. रूपाने त्याच्याकडे तिचे पैसे मागितले तेव्हा सलीमने रागाच्या भरात तिचा गळा दाबून खून केला. यानंतर, आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. तो रुपाचा मृतदेह मोटारसायकलवरून जवळच्या नाल्याजवळ घेऊन गेला. पण नशिबाने त्याचे रहस्य उलगडले. वाटेत मृतदेह घसरून खाली पडला आणि लोकांना ते लक्षात आले. घाबरून सलीम तिथून पळून गेला.
हरदोई येथून आरोपीला अटक
सत्य समोर येताच पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली. सलीम हरदोई येथील त्याच्या वडिलोपार्जित घरी पळून गेला होता. परंतु तांत्रिक देखरेख आणि सतत छापे टाकल्यानंतर पोलिसांनी त्याला तेथून अटक केली. सध्या सलीम पोलिस कोठडीत आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की त्याच्या चौकशीतून आणखी अनेक महत्त्वाची तथ्यं समोर येऊ शकतात. या खळबळजनक हत्येमुळे परिसरात दहशत पसरली आहे. केवळ पैशाच्या वादामुळे एका व्यक्तीचा जीव गेला, हे पाहून लोकांना धक्का बसला आहे.