पोलीस आले अन् गावात खड्डे खाणले, सापडली धक्कादायक वस्तू, समोरचं दृश्य पाहाताच महिलांनी केला पोलिसांवर हल्ला
बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू विक्रीचे रॅकेट समोर आले आहे, बनावट दारू पिल्यानं अनेकांना विषबाधा झाल्याचा प्रकार देखील घडला आहे. त्यामुळे अशा विषारी दारूवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात पोलिसांच्या वतीनं मोठं अभियान सुरू आहे. याचदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सरैया पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील दारूच्या भट्ट्या नष्ट करण्यासाठी पोलीस पोहोचले मात्र तिथे महिलांकडून पोलीसाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एक पुरुष आणि सहा महिलांना अटक केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आणि मद्यनिर्मितीचं साहित्य जप्त केलं आहे.
होळीच्या काळामध्ये बिहारमध्ये मोठ्याप्रमाणात मद्याचं सेवन केलं जातं. अनेकजण बनावट देशी दारू देखील पितात, अशी दारू पिल्यानं विषबाधेचा धोका असतो. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलिसांकडून राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. या अंतर्गत मुजफ्फरपूर जिल्ह्यातील सरैया पोलीस ठाण्यातंर्गत विशेष अभियान राबवण्यात आलं आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बहिलवारा परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूच्या भट्ट्या नष्ट करण्यासाठी छापा टाकला. मात्र यादरम्यान तेथील महिलांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी आधी या महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलांनी पोलिसांना शिव्या देण्यास सुरुवात केली. पोलिसांवर थेट हल्ला केला, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून अखेर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी साह महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे.
दरम्यान गावात पोलिसांची संख्या वाढताच हल्लेखोर आणि गावातील इतर लोक देखील जिकडे जागा दिसेल तिकडे पळत सुटले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात जणांना अटक केली आहे. तसेच गावात अनेक ठिकाणी छापेमारी केली. लोकांनी जमिनीत पुरून ठेवलेली दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. पोलिसांना या गावात मोठ्याप्रमाणात दारूचा साठा आढळून आला आहे. पोलिसांनी तो साठा नष्ट केला.