
देशात पतीने पत्नीची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता राजगड जिल्ह्यातील नागोठणे येथे एका महिलेना आपल्या पतीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. नागोठणे पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस आणत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची चौकशी केली असता मृत तरुण कृष्णा नामदेव खंडवी (रा. गौळवाडी, पेण) याचा त्याच्याच पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीसोबत कट रचून खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पोलीसांनी कृष्णा नामदेव खंडवी याच्या हत्या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. याती दिपाली ( वय – 19), तिचा 21 वर्षीय प्रियकर उमेश सदु महाकाळ आणि त्यांची 19 वर्षीय मैत्रीण सुप्रिया चौधरी यांची समावेश आहे. या तिघांनी संगनमत करून कृष्णा खंडवीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. इन्स्टाग्रामवर बनावट पायल वारगुडे नावाचे खाते उघडून कृष्णाशी संपर्क साधला.
पायल वारगुडे नावाच्या अकाउंटवरून 10 ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावण्यात आले. त्यानंतर त्याला गोड बोलून वासगावच्या जंगलात नेले आणि ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. तसेच ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून टाकला. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केले.
कृष्णा खंडवी याची हत्या कोणी केली याची तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. सुरुवातीला या प्रकरणाचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे पोलीसांनी तपासाची सूत्रे फिरवली.पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतले आहे. आता या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कुलकर्णी (सहायक पोलीस निरीक्षक) यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींनी कृष्णाची हत्या का केली? यामागे नेमकं काय कारण आहे हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आता रायगड पोलीसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही संशयास्पद माहिती किंवा व्यक्ती दिसल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.