मुंबई : महाराष्ट्रात नुकतीच तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला. विशेष म्हणजे जुन्या पेन्शन योजनेवरुन भाजपला (BJP) घेरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं देखील बघायला मिळालं. याशिवाय याच मुद्द्यावरुन या निवडणुकीत महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) भाव खावून गेली. पाच पैकी तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. तर भाजपला फक्त एका ठिकाणी समाधान मानावं लागलं. या निवडणुकीला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने शिक्षकांना खूश करण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. राज्य सरकारने शिक्षकांच्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे.