
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2023 | पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे मतदान ३० नोव्हेंबर रोजी संपले. आता ३ डिसेंबर रोजी निकाल येणार आहेत. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज गुरुवारी जाहीर झाले. विविध संस्थांनी केलेल्या अंदाज पाहिल्यावर एक्झिट पोल स्वत: ‘कन्फ्यूज’ झाल्याचे दिसून येते. एक्झिट पोल हा ढोबळ अंदाज असला तरी वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळे अंदाज काढल्यामुळे सर्वच संभ्रमात आले आहे. यंदाचा एक्झिट पोल मिझोरम आणि तेलंगणासंदर्भात बऱ्यापैकी सारखा आहे. परंतु मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसंदर्भात कन्फ्यूजन वाढवणारे अंदाज आले आहे. एक्झिट पोलनुसार तेलंगणात मोठा बदल दिसत आहे. या ठिकाणी बीआरएसची असलेली दहा वर्षांची सत्ता जाण्याची चिन्ह आहेत. काँग्रेस सत्तेवर येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. एंटी इन्कम्बेंसीचा फटका केसीआर यांना तेलंगणात बसत आहे.
राजस्थानमध्ये एक्झिट पोलच्या अंदाज वेगवेगळे आहे. काही एक्झिट पोल भाजप विजयी होणार असल्याचा दावा करत आहे तर काही ठिकाणी काँग्रेस विजयी होणार असल्याचे म्हटले जात आहे. राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. परंतु दर पाच वर्षांनी राजस्थानमध्ये सत्ताबदल होण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून आहे. सर्वच एक्झिट पोल एका मार्गावर जात नसल्यामुळे ३ डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपकडून मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट केले गेले नाही. राजस्थानमध्ये पुन्हा अशोक गेहलोत यांनी संधी दिली जाणार की राजेश पायलटकडे सूत्र देणार? हे काँग्रेसने सांगितले नाही. भाजपनेही वसुंधरा राजेकडे सूत्र देणार का? हे ही सांगितले नाही. त्यामुळे त्याचा कोणत्या पक्षाला फायदा, तोटा होईल, हे ३ डिसेंबर रोजी समजणार आहे.
मध्य प्रदेशातील एक्झिट पोल वेगवेगळा आहे. सर्वच एक्झिट पोलनुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे. परंतु काही जणांना काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे तर काहींनी पुन्हा भाजप येणार असल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेशात भाजपची कमान शिवराज सिंह यांच्याकडे होती. परंतु पुन्हा शिवराज सिंह हेच मुख्यमंत्री होणार आहे का? हे भाजपकडून स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे चेहरा नसल्याचा भाजपला फटका बसणार का ? हे तीन डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.