
राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या गुरुवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाणार आहे. महापौर पदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध महानगरपालिकामधे महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल आणि सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येईल. ही सोडत नगरसेवक प्रभागांच्या आरक्षणानुसार नव्याने न काढता, चक्राकार पद्धतीने (रोटेशनल/सर्क्युलर पद्धत) काढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता ही पद्धत नेमकी काय आहे वाचा…
चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढली गेल्यास, सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग वगळता उर्वरित प्रवर्गांपैकी (जसे SC, ST, OBC, महिला इत्यादी) एखादे आरक्षण निघण्याची शक्यता आहे. मागील महापौरपद (२०२० मध्ये) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होते (किशोरी पेडणेकर), त्यामुळे या चक्राकार पद्धतीने एससी (SC) किंवा ओबीसी (OBC) प्रवर्गाचे आरक्षण निघण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. (काही माध्यमांनुसार ST प्रवर्गाचीही चर्चा आहे, ज्यामुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात.)
पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली आहेत. त्यानुसार, काँग्रेस पक्षाने आपल्या नगरसेवकांची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे पूर्ण केली आहे. आता भाजप, शिवसेना आणि इतर पक्षांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
महापौर कोण होणार याची चर्चा सुरू असली तरी, प्रथम कोणत्या आरक्षण प्रवर्गातील व्यक्ती महापौर होऊ शकते हे निश्चित होणे गरजेचे आहे. त्यानुसार, गुरुवार, २२ जानेवारी रोजी ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. हे आरक्षण नव्याने शून्यापासून न काढता, मागील आरक्षणाचा विचार करून चक्राकार पद्धतीने ठरवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
आतापर्यंत मुंबई महापौरपदाचे आरक्षित प्रवर्ग असे होते:
सन २०००: सर्वसाधारण (हरेश्वर पाटील)
सन २००२: एससी (महादेव देवळे)
सन २००५: सर्वसाधारण (दत्ताजी दळवी)
सन २००७: ओबीसी महिला (डॉ. शुभा राऊळ)
सन २००९: सर्वसाधारण महिला (श्रद्धा जाधव)
सन २०१२: सर्वसाधारण (सुनील प्रभू)
सन २०१४: एससी महिला (स्नेहल आंबेकर)
सन २०१७: सर्वसाधारण (विश्वनाथ महाडेश्वर)
सन २०२०: सर्वसाधारण (किशोरी पेडणेकर)
चक्राकार पद्धत कशी असते?
-महापौर पदाचे आरक्षण हे चक्राकार पद्धतीने निघणार आहे.
-महापौरपदासाठी मागील 20 वर्षांचे आरक्षण वगळून इतर प्रवर्गांची चिठ्ठी सोडतीसाठी टाकली जाते.
-म्हणजेच, जर मागील महापौर सर्वसाधारण प्रवर्गातील असेल, तर पुढील सोडतीत या प्रवर्गाचा विचार केला जात नाही.
-त्या प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्ग (SC, ST, OBC, महिला इत्यादी)च्या चिठ्ठ्या लॉटरीसाठी टाकल्या जातात.
-यामुळे आरक्षण रोटेशनल पद्धतीने फिरते आणि विविध प्रवर्गांना संधी मिळते.
-ही सोडत राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी एकत्रितपणे मंत्रालयात सकाळी ११ वाजता होणार असून, त्यानंतरच महापौर निवडीची प्रक्रिया पुढे जाईल.
या 29 महापालिकांमध्ये बसणार महापौर
-मुंबई
-ठाणे
-नवी मुंबई
-उल्हासनगर
-कल्याण डोंबिवली
-भिवंडी निजामपूर
-मिरा भाईंदर
-वसई विरार
-पनवेल
-नाशिक
-अहिल्यानगर
-जळगाव
-धुळे
-मालेगाव
-पुणे
-पिंपरी चिंचवड
-सोलापूर
-कोल्हापूर
-इचलकरंजी
-सांगली-मिरज-कुपवाडा
-छत्रपती संभाजीनगर
-नांदेड-वाघाळा
-परभणी
-जालना
-लातूर
-अमरावती
-अकोला
-नागपूर
-चंद्रपूर
उद्या BMC Mayor Live Update पाहण्यासाठी इथे क्लिक करा-