
राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक नेत्यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उलट्यासुलट्या युती आणि आघाड्या झाल्या आहेत. मित्र एकमेकांचे शत्रू म्हणून लढताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी अनेक वर्षापासूनचे एकमेकांचे शत्रू मित्र म्हणून लढताना दिसत आहे. तर काही ठिकाणी तर जे पक्ष कधीच युती किंवा आघाडीत एकत्र येणार नाहीत, असं राज्यात वर्षानुवर्षाचं चित्र होतं, ते साफ पुसलं गेलं आहे. कधीही एकत्र येऊ न शकणारे राजकीय पक्ष एकत्र आलेले दिसत आहे. जालन्यात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी राज ठाकरे यांच्या मनसेने युती केली आहे. या युतीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीही सामील झाली आहे. राज्यात आंबेडकर, ठाकरे आणि पवार घराणं पहिल्यांदाच एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
जालना महापालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे जालन्यात कुणाचा पहिला महापौर बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपलंच वर्चस्व निर्माण करण्यासाठी गणित जुळवण्याचं काम सुरू केलं आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. वंचित बहुजन आघाडीही या युतीत सामील झाली आहे.
अजितदादांची राष्ट्रवादी काल महायुतीतून बाहेर पडली होती. त्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीने मनसे बरोबर बोलणी केली आणि युती फिक्सही झाली. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी या युतीची घोषणा केली आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे 50 तर मनसेचे 6 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. जालन्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीचं चित्र काही वेगळंच असणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आमचाच पहिला महापौर
महायुतीतील दोन्ही पक्ष आम्हाला नगण्य समजत होते. सोबत घ्यायला तयार नव्हते, असं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण म्हणाले. जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर राष्ट्रवादीचाच होईल असा दावाही चव्हाण यांनी केला आहे.
भाजप आरपीआयसोबत
जालन्यात महायुतीमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. भाजप 65 पैकी 64 जागावर निवडणूक लढत असून RPI (A)1 जागा लढवणार आहे. शिंदे गट सर्वच्या सर्व 65 जागा लढवणार आहे.तर अजित पवारांची राष्ट्रवादी वंचित आणि मनसे एकत्रित निवडणूक लढणार आहे.
आघाडीत काँग्रेस वरचढ
महाविकास आघाडीत काँग्रेस 40 जागा लढवणार आहे. तर शरद पवार गट 13 जागा आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना 12 जागा लढवणार आहेत. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याने जालन्यात महाविकास आघाडीचा दावा मजबूत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रत्यक्षात निवडणूक निकालातच या महापालिकेचं चित्र स्पष्ट होणार आहे.