
लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून देशात पुन्हा एनडीए सत्ता स्थापन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयाची हॅटट्रिक केली असली तरी भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही भाजपची पिछेहाट झाल्याचे दिसून आले. तर आत्तपर्यंत सत्ताधारी ज्या काँग्रेस आणि मविआची खिल्ली उडवत होते, त्यांच्या महाराष्ट्रात ३० जागा निवडून आल्या आहेत. तर महायुतीला मात्र 17 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारूण पराभव झाला. याचदरम्यान भाजप आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पूर्वी केलेले एक विधान पुन्हा चर्चेत आले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मविआला 18 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा केली होती. त्यांच्या याच घोषणेचा दाखला देत शिवसेना उबाठा गटाकडून त्यांना डिवण्यात आलं आहे.
सुषमा अंधारे यांनी लगावला टोला
शिवसेना उबाठा गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी शेलार यांना उद्देशून एक खोचक ट्विट केलं आहे. ‘ आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना… म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी , लोटी , सगळं देता येईल.. !’अशी खोचक टीका करत अंधारे यांनी शेलार यांना टोला लगावला.
आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना…
म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी , लोटी , सगळं देता येईल.. !@ShelarAshish @ShivSenaUBT_ @AUThackeray pic.twitter.com/8DxFmXUv7q— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) June 4, 2024
लोकसभेच्या निकालानंतर आशिष शेलार यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला. आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम येथील विधासभेचे आमदार आहेत. त्यांना उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्यात येत होती, पण त्यांनी नकार दिल्याने नंतर भाजपाने ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. पण या लढतीत त्यांचा दारूण पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्वल निकम यांना पराभूत करून विजय संपादन केला.