मिठाई दिली त्यांनाच मंत्रिपदे, रामदास कदम यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा भांडाफोड

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करताना रामदास कदम यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांना मिठाई दिल्याशिवाय मंत्रीपद किंवा आमदारकी मिळत नसायची, असा गंभीर आरोपच रामदास कदम यांनी केला आहे. ते येथील एका सभेत बोलत होते.

मिठाई दिली त्यांनाच मंत्रिपदे, रामदास कदम यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा भांडाफोड
ramdas kadam
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 20, 2024 | 4:04 PM

शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. मी राजकारणात अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिले आहेत. नरेंद्र मोदींना मतं देऊ नका, अशी मुस्लिमांना भीती दाखवली जात आहे. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे. त्यांनी मराठी माणसाला फसवले. मला फसवले.. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसला आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, अशी जहरी टीका करतानाच ज्याने मिठाई दिली त्यांनाच उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदे दिल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.

रामदास कदम यांनी सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांचा भांडाफोड केला. उद्धव ठाकरे यांची नस न् नस मला माहीत आहे. सूर्यकांत दळवी आणि माझे मतभेद होते. पण पाच वेळा आमदार निवडून आलेल्या माणसाला विधान परिषद दिली नाही. ज्यांनी मिठाई दिली, त्यांना मंत्रिपदे आणि आमदारकी दिली, असं गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

तुझे माझे जमेना…

रामदास कदम यांनी कालपर्यंत सूर्यकांत दळवी यांच्यावर टीका केली होती. पण आज भरसभेतून त्यांची प्रशंसा केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सूर्यकांत दळवी यांच्यासोबतच्या वादावर रामदास कदम यांनी मिश्किल भाष्यही केलं. तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना अशी आपली स्थिती आहे, असं रामदास कदम म्हणाले.

मिठाईमुळे प्रोजेक्ट बारगळला

कोकाकोला प्रोजेक्ट आणण्यात माझे मोठे योगदान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या माध्यमातून केवळ 40 दिवसात मी हा प्रोजेक्ट कोकणात आणला. हा प्रोजेक्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई उद्योग मंत्री असतानाच यायला हवा होता. पण मिठाईमुळे प्रकल्प बारगळला. कंपनी सोबत चर्चा होताना आधी आम्हाला भेटा असे सांगण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.

तेव्हाच समृद्धी येईल

कोयनेचे 67 टीएमसी वाया जाणारे पाणी कोकणात वळवण्याचा ठराव शेवटच्या कॅबिनेटमध्ये संमत झाला होता. 8 हजार कोटीचा निधी या प्रकल्पासाठी लागणार होता. ज्यावेळी हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईल तेव्हा कोकणात समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.