हे गाणं ऐकताच थिएटरमध्ये रडायचे लोक, तरीही रेडिओवर ऐकण्यासाठी वेडे व्हायचे लोक, आजही आवडीने गाणं ऐकतात लोक
40 वर्षांपूर्वीचं गाणं, जे ऐकताच थिएटरमध्ये रडायचे लोक. इतकं सुंदर गाणं की चित्रपट संपल्यानंतर देखील लोक बीबीसी रेडिओवर हे गाणं लावण्यासाठी मागणी करायचे. एकाच टेकमध्ये झालं होतं रेकॉर्ड.

बॉलिवूडमधील अनेक चित्रपट त्यांच्या कथेमुळे नाही तर गाण्यांमुळे कायमचे लक्षात राहतात. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाम’ या चित्रपटाचंही असंच काहीसं झालं. महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटाला ‘चिठ्ठी आई है’ या गाण्याने वेगळी ओळख मिळवून दिली. आजही हे गाणं प्रेक्षकांच्या मनात तितकंच लोकप्रिय आहे.
‘चिठ्ठी आई है’ हे गाणं ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या आवाजात अजरामर झालं. या गाण्याला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलं असून गीतकार आनंद बक्षी यांनी त्याचे भावस्पर्शी शब्द लिहिले आहेत. परदेशात नोकरीसाठी किंवा उदरनिर्वाहासाठी घरापासून दूर गेलेल्या भारतीयांच्या भावना या गाण्यातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाल्या.
एका टेकमध्ये झालं रेकॉर्डिंग
‘चिठ्ठी आई है’च्या रेकॉर्डिंगशी संबंधित अनेक आठवणी आजही सांगितल्या जातात. महबूब स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग एका टेकमध्ये झाल्याचं सांगितलं जातं. गाणं ऐकताना स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांनीही हे गाणं ऐकल्यानंतर पंकज उधास यांच्या गायकीचं कौतुक केलं होतं.
विशेष म्हणजे सुरुवातीला पंकज उधास यांनी चित्रपटात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांना आपल्याला अभिनय करावा लागेल असा गैरसमज झाला होता. मात्र, नंतर त्यांना या गाण्याच्या प्रसंगात स्वतः गायक म्हणूनच सादरीकरण करायचं असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यांनी हा प्रसंग साकारला.
‘नाम’च्या यशात गाण्याचा मोठा वाटा
‘नाम’ चित्रपटात संजय दत्त, कुमार गौरव, नूतन, अमृता सिंह, पूनम ढिल्लों आणि परेश रावल यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाच्या कथानकातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर ‘चिठ्ठी आई है’ हे गाणं येतं. घरापासून दूर गेलेल्या व्यक्तीची भावनिक अवस्था या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि तब्बल 50 आठवडे चित्रपटगृहांमध्ये चालला. या यशामध्ये ‘चिठ्ठी आई है’ या गाण्याचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं. गाण्याची लोकप्रियता इतकी वाढली की चित्रपट संपल्यानंतरही अनेक ठिकाणी प्रेक्षकांकडून हे गाणं पुन्हा दाखवण्याची मागणी होत असे.