32 वर्षांपूर्वीचं बोल्ड गाणं आजही चर्चेत, Gen Z आणि Millennials आई-बाबांसमोर हे गाणं म्हणणे टाळतात, तुम्ही ऐकलं का?
32 वर्षांपूर्वीचं लोलो (करिश्मा कपूर) आणि चीची (गोविंदाचं) हे गाणं समोर येताच मोठा वाद पेटला. हे गाणं ऐकताच लोकं थिरकायला लागायचे. जेन झी आणि मिलेनियल्सचं हे गाणं आवडतं असलं तरी ते घरच्यांसमोर अजूमही लावता येत नाही. कोणतं होतं ते गाणं ?

हिंदी सिनेसृष्टीत अशी अनेक गाणी आहेत, ज्यांचे सूर कानावर पडताच पाय थिरकू लागतात. काही गाणी त्यांच्या संगीतामुळे लोकप्रिय होतात, तर काही गाणी त्यांच्या बोलांमुळे चर्चेत येतात. ९० च्या दशकातही असेच एक गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र, त्याच्या बोलांवरून मोठा वाद निर्माण झाला आणि गाण्याचे शब्द बदलण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, या गाण्यात करिश्मा कपूर आणि गोविंदा यांची जोडी पाहायला मिळाली होती. आजही या गाण्याचे मूळ बोल कुटुंबीयांसमोर गाणे अनेकांना अवघड वाटू शकते.
‘बेबी-बेबी’ झालं गाण्याचं नाव
1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या खुद्दार या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होते. त्या वेळी करिश्मा केवळ 19वर्षांची होती. या चित्रपटातील एका गाण्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. अलीशा चिनॉय आणि अनु मलिक यांच्या आवाजातील या गाण्याला त्याच्या ठेक्यामुळे आणि संगीतामुळे लोकप्रियता मिळाली. मात्र, त्यातील काही बोलांवर आक्षेप घेण्यात आल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. मात्र गाण्याच्या मूळ बोलांवर अश्लीलतेचा आरोप झाल्यानंतर त्यात बदल करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ‘बेबी-बेबी मुझे लोग बोले’ असे बदललेले शब्द त्यात वापरण्यात आले. अनु मलिक यांनी या गाण्याला संगीत दिलं, तर इंदीवर यांनी त्याचे बोल लिहिले होते. गाण्यात करिश्मा कपूरच्या नृत्याचीही विशेष चर्चा झाली होती. अलिशा चिनॉयने हे गाणं गायलं होतं.
इतर गाणीही झाली हिट
इक्बाल दुर्रानी दिग्दर्शित खुद्दार या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत कादर खान, शक्ती कपूर आणि अनिल धवन यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते. चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये एकूण सात गाणी होती. अनु मलिक यांच्या संगीताने सजलेल्या या अल्बममध्ये रोमँटिक गाण्यांसोबतच धमाल आणि नृत्यप्रधान गाण्यांचाही समावेश होता. या चित्रपटातील गाणी कुमार सानू, अलका याज्ञिक, अनु मलिक, अलीशा चिनॉय आणि सोनू निगम यांसारख्या लोकप्रिय गायकांनी गायली होती. बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार, या साउंडट्रॅकच्या सुमारे 2 लाख 80 हजार युनिट्सची विक्री झाली होती. त्यामुळे 1994 मधील सर्वाधिक विक्री झालेल्या साउंडट्रॅक्समध्ये त्याचा आठवा क्रमांक लागला होता.
काय म्हणाली होती करिश्मा कपूर ?
या गाण्याच्या बोलांवरून झालेल्या वादाबद्दल करिश्मा कपूरला विचारण्यात आले होते. त्यावेळी तिने, या गाण्यावर एवढा गदारोळ का झाला, हे आपल्याला समजत नसल्याचे म्हटलं होत. गाण्यातील शब्द लोकांना इतके आक्षेपार्ह का वाटतात, याबद्दलही तिने आश्चर्य व्यक्त केलं. करिश्माच्या या प्रतिक्रियेची त्या काळात बरीच चर्चा झाली होती.
