
‘आश्रम’ या वेब सीरिजचे तीन सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि या तिनही सिझन्सला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी या वेब सीरिजचा तिसरा सिझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला. यामधील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली आहे. या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहणकरने पम्मीची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये अदितीने बरेच इंटिमेट सीन्स दिले आहेत. सहअभिनेता चंदनसोबतही तिचे काही इंटिमेट सीन्स आहेत. नुकतीच ती ‘शी’ या वेब सीरिजमध्येही झळकली होती. या सीरिजमध्ये तिने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अदितीने सांगितलं की, ज्या प्रकारच्या भूमिका तिने पडद्यावर साकारल्या आहेत, त्यांची निवड तिने स्वत:च्या मर्जीनेच केली आहे.
अदिती पोहणकरने जरी स्वत:च्या मर्जीने या भूमिका साकारल्या असल्या तरी तिच्या नातेवाईकांनी, आईवडिलांनी आणि मित्रमैत्रिणींनी बोल्ड भूमिका न साकारण्याचा सल्ला दिला होता. अदितीने मात्र कोणाचंच ऐकलं नाही. ‘फिल्मीग्यान’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली, “योग्य, अयोग्य असं काहीच नसतं. काहीच नसतं. तुम्ही तुमच्या हिशोबाने योग्य-अयोग्य काय ते ठरवा. मला कितीतरी लोकांनी सांगितलं की अशा प्रकारच्या भूमिका तू साकारू नकोस. तू तर ग्लॅमरस पण दिसत नाहीस. तू बोल्डसुद्धा वाटत नाहीस.”
“मी सर्वांना एकच उत्तर दिलं की, तुम्ही वेडे आहात. जरी अनेक लोकांकडे मला ते सांगण्याची हिंमत नव्हती, तरी त्यांनी ते केलं. त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर मी सांगितलं की मी त्या भूमिका करण्यास आधीच होकार दिला होता, तेही पटकथा न वाचता”, असं तिने पुढे सांगितलं.
‘आश्रम’मधील इंटिमेट सीन्सबद्दल चंदन रॉय सान्याल एका मुलाखतीत म्हणाला होता, “सेटवर कोणीच नसायचं. फक्त आमचे डीओपी, दिग्दर्शक प्रकाश आणि दोन-तीन मुली असायच्या. अदिती स्वत: अत्यंत प्रोफेशनल अभिनेत्री आहे. सीन शूट करण्यापूर्वी मी तिच्याशी बरीच चर्चा करायचो. मी तिचा आत्मविश्वास जिंकायचा प्रयत्तन केला. कारण हे खूप गरजेचं असतं. हे जग महिलांसाठी कठीण आहे, ही गोष्ट तर मानावी लागेल. एका दृष्टीने पाहिलं तर हे जग महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी बनलेलंच नाही. त्यामुळे सर्वांत आधी तुम्हाला विश्वास, प्रेम आणि काळजीने काम करावं लागतं.”