पहिल्या दोन पत्नींसोबत का झाला आमिर खानचा घटस्फोट? अनेक वर्षानंतर समोर आलं कारण
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आज तिसरं लग्न करत आहेत. पण या आधीची दोन लग्न का तुटली हे फार कमी लोकांना माहिती आहे. नेमकं का झाला दोघींसोबत घटस्फोट?

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. आज ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच आता या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि त्याच्या दोन घटस्फोटांमागील कारणांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी एका मुलाखतीत आमिर खानने आपल्या दोन्ही विवाहांबाबत मनमोकळेपणाने भाष्य केले होते.
आमिर खानने 18 एप्रिल 1986 रोजी रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. त्यावेळी तो अवघ्या 21 वर्षांचा होता. विशेष म्हणजे, चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावण्यापूर्वीच त्याने लग्न केले होते आणि सुरुवातीला ही गोष्ट सार्वजनिक केली नव्हती.
रीना दत्तासोबत नेमकं काय घडलं?
‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात बोलताना आमिर खानने सांगितले होते की, पहिल्या घटस्फोटाच्या वेळी तो खूपच कमी वयाचा आणि अपरिपक्व होता. त्याच अपरिपक्वतेमुळे वैवाहिक नाते टिकू शकले नाही. रीना दत्ता यांच्यापासून वेगळे होणे हा त्याच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी अनुभव होता. त्या काळात तो मानसिकदृष्ट्या खचला होता आणि काही काळ मद्याच्या व्यसनाकडेही वळला होता. पहिल्या नात्यातून सावरण्यासाठी त्याला बराच काळ लागला. त्यानंतर त्याने पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले.
याच काळात ‘लगान’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याची ओळख किरण राव यांच्याशी झाली. दोघांमधील मैत्री पुढे प्रेमात बदलली. त्यानंतर आमिरने डिसेंबर 2005 मध्ये किरण राव यांच्याशी विवाह केला. ‘फना’ चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी दिग्दर्शक कुणाल कोहली यांच्याकडे 10 दिवसांच्या सुट्टीची विनंती करताना आपण लग्न करणार असल्याची माहिती त्याने दिली होती.
किरण रावसोबत का झाला घटस्फोट?
अनेक वर्षे एकत्र संसार केल्यानंतर आमिर खान आणि किरण राव यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर आमिरने सांगितले होते की, किरण राव यांना अधिक स्वतंत्र आयुष्य जगायचे होते. त्यांच्या इच्छेचा आदर करत दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, विभक्त झाल्यानंतरही दोघे मुलाच्या संगोपनासाठी आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी एकत्र काम करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
आता गौरी स्प्रॅटसोबतच्या नव्या आयुष्याची चर्चा सुरू असताना, आमिर खानच्या भूतकाळातील वैवाहिक प्रवासाचीही पुन्हा एकदा चर्चा होता आहे.