औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिग्गजांची एन्ट्री! संचालक मंडळात मंत्री, खासदार आणि आमदारांचे वर्चस्व, बाजी मारली कुणी?
Aurangabad District Central Bank Election Result : बहुचर्चित औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. संचालक मंडळावर जिल्ह्यातील दिग्गजांची एंट्री झाली आहे. महायुतीने बिनविरोधाचे बिगुल वाजवत अगोदरच मोठी खेळी केली होती. आता निकालाने संचालक मंडळाचे चित्र स्पष्ट केले आहे.

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सकाळीच निकाल समोर आले. गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. संचालक मंडळावर जिल्ह्यातील दिग्गजांची एंट्री झाली आहे. महायुतीने 20 जागांपैकी 7 संचालक अगोदरच बिनविरोध आणण्याची यशस्वी खेळी केली होती. महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने अगोदरच बाजी मारली होती. आज निकालाचे (Aurangabad District Central Bank Election Result) चित्र स्पष्ट झाले. संचालक मंडळात मंत्री, खासदार, आमदारांचे वर्चस्व दिसले.
जिल्हा बँकेचे हेवीवेट संचालक मंडळ
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदारांचेच वर्चस्व दिसून आले. बँकेचा निकाल नुकताच हाती आला. त्यात संचालक मंडळातील 21 सदस्यांपैकी 2 मंत्री, 1 खासदार, 5 आमदार संचालक मंडळावर निवडून आल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेचे हेवीवेट संचालक मंडळ सध्या चर्चेत आले आहे.
संचालक मंडळात या दिग्गजांची एंट्री
पालकमंत्री संजय शिरसाट बिनविरोध
कॅबिनेट मंत्री अतुल सावे विजयी
आमदार रमेश बोरनारे बिनविरोध
आमदार अंबादास दानवे विजयी
आमदार विलास भुमरे बिनविरोध
आमदार अनुराधा चव्हाण विजयी
आमदार संजना जाधव विजयी
खासदार डॉ. कल्याण काळे विजयी
शनिवारी झाले मतदान
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 4 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. 1053 पैकी 1048 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँक निवडणुकीसाठी 99 टक्के मतदान झाले होते. आज सकाळीच निकाल येण्यास सुरुवात झाली. नवीन संचालक मंडळात दिग्गजांची एंट्री झाली. मंत्री, आमदार आणि खासदारांचे हेविवेट संचालक मंडळ निवडून आले.
आठ संचालक बिनविरोध
महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलचे 7 संचालक बिनविरोध निवडून आले होते. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या महाविकास आघाडीच्या भूमिपूत्र शेतकरी बचाव पॅनलाचा एक संचालक निवडून आला होता. जिल्हा बँकेचे अशाप्रकारे आठ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.
तर गंगापूर, सोयगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर या चार तालुक्यातील चार जागांसाठी, बिगर शेती मतदारसंघाच्या पाच जागांसाठी, दोन महिला आणि इतर मागासवर्गातील एक अशा एकूण 12 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकूण 31 उमेदवार रिंगणात होते.
