तिच्याशी लग्न करणं आयुष्यातील सर्वांत मोठी चूक; आमिर खानचा खुलासा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानला त्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या चुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने एका लग्नाचा उल्लेख केला. अवघ्या चार महिन्यात लग्नासारखा मोठा निर्णय घेणं चुकीचं होतं, असं तो म्हणाला.

तिच्याशी लग्न करणं आयुष्यातील सर्वांत मोठी चूक; आमिर खानचा खुलासा
आमिर खान
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 02, 2025 | 2:08 PM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 20 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. याच प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत आमिर त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने त्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक सांगितली. पहिली पत्नी रीना दत्तशी घाईगडबडीत लग्नाचा निर्णय घेतल्याबद्दल त्याने पश्चात्ताप व्यक्त केला.

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये आमिरला त्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक कोणी, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर तो म्हणाला, “मी चुका अनेक केल्या आहेत, एक नाही. पण मला असं वाटतं की त्या चुकांमुळेच आज याठिकाणी आहे. फक्त यशामुळेच मी इथवर पोहोचलो नाही तर चुकांमुळेही मला मार्ग सापडत गेला.”

याविषयी त्याने पुढे सांगितलं, “साधंसरळ उदाहरण द्यायचं झालं तर रीना आणि मी खूप लवकर लग्न केलं. तेव्हा मी 21 वर्षांचा आणि ती 18-19 वर्षांची होती. 21 वर्षांचा झाल्यानंतर तुम्हाला एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. त्यानुसार 14 मार्चला मी 21 वर्षांचा झालो आणि त्यानंतर एक महिन्याची नोटीस दिली असती तर 14 एप्रिल ही तारीख असती. त्यात शनिवार-रविवारसुद्धा येत होते. रीना आणि माझं लग्न कायदेशीर पद्धतीने होण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत थांबायची गरज होती. अखेर 18 एप्रिल रोजी आम्ही लग्न गेलं. तेव्हा आम्ही फक्त चार महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होतो. त्या चार महिन्यातसुद्धा आम्ही एकमेकांसोबत खूप कमी वेळ घालवला होता.”

“आमच्या मनात एकमेकांविषयी प्रेम खूप होतं. म्हणूनच आम्ही लग्न केलं होतं. पण आज त्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा वाटतं की लग्नासारखं मोठं पाऊल उचलताना खूप विचार करायला हवा. त्यावेळी तारुण्याच्या आवेशात तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत. परंतु नंतर तुम्हाला त्यांची जाणीव होते. ही वेगळी गोष्ट आहे की रीनासोबत मी खूप चांगलं आयुष्य जगलोय. त्यामुळे ती चुकीची होती वगैरे असा अर्थ काढू नका. रीना खूप चांगली आहे आणि एका अर्थी आम्ही दोघं एकत्रच मोठे झालो. कारण इतक्या कमी वयात आम्ही लग्न केलं होतं. आम्ही दोघं एकमेकांचा खूप आदर करतो. आमच्या मनात एकमेकांविषयी प्रेमसुद्धा आहे. परंतु मला असं वाटतं की कोणीही इतक्या घाईगडबडीत लग्नाचं पाऊल उचलू नये”, असं मत आमिरने मांडलं.

रीनासोबत कमी वयात लग्न केल्याचा पश्चात्ताप आहे का, याविषयी आमिर म्हणाला, “आज जेव्हा मी विचार करतो तेव्हा वाटतं की कदाचित मी ते पाऊल उचललं नसतं तर? पण जर मी ते केलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर बसलो नसतो. त्यामुळे त्या गोष्टीकडे मी चूक म्हणून पाहत नाही. कारण तिने मला माझ्या आयुष्यातील दोन सर्वांत सुंदर भेट दिले आहेत, ते म्हणजे माझी मुलं.. जुनैद आणि आयरा. रीनासोबत मी 16 वर्षांचा संसार केला. त्यामुळे हे सर्व चुकीचं नाही. चूक मी त्या गोष्टीला म्हणेन, जे मी चार महिन्यात लग्नाचा निर्णय घेतला होता. इतका मोठा निर्णय मी इतक्या घाईत घेतला होता. अशा बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्या आहेत. परंतु कुठे ना कुठे त्या माझ्या चांगल्यासाठीच घडल्या आहेत, असं मी मानतो. माणूस त्याच्या चुकांमधूनच शिकतो.”