आम्ही पती-पत्नी नसलो तरी..; गर्लफ्रेंड गौरी अन् पूर्व पत्नींबद्दल काय म्हणाला आमिर खान?
आमिर खान आणि रीना दत्ताने 1986 मध्ये लग्न केलं. तर 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना जुनैद खान आणि आयरा खान ही दोन मुलं आहेत. त्यानंतर 2005 मध्ये आमिरने किरण रावशी लग्न केलं. लग्नाच्या 15 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना आझाद हा मुलगा आहे.

गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान चर्चेत आला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर त्याच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. किरण रावसोबतच्या घटस्फोटानंतर जाणूनबुजून कोणाच्या शोधात नव्हतो, गौरीशी भेट अचानक आणि अनपेक्षित झाली, असं तो म्हणाला. त्याचसोबत किरण राव आणि रीना दत्ता या दोन्ही पूर्व पत्नींसोबत त्याचं नातं आता कसं आहे, याचाही खुलासा त्याने केला. या दोघीही कायम कुटुंबाचा एक भाग असतील, असंही त्याने स्पष्ट केलं.
‘राज शमानी’ला दिलेल्या या मुलाखतीत आमिर म्हणाला, “गौरीशी भेटण्यापूर्वी मला वाटलं होतं की माझं वय झालंय आणि आता या वयात मला कोण भेटणार? त्याचवेळी माझी थेरपीसुद्धा सुरू होती आणि मला माझ्यावर आधी प्रेम करायची गरज आहे हे मी समजून चुकलो होतो. त्यामुळे मी त्यावर काम करत होतो. किरण आणि रीनासोबत माझं खूप स्ट्राँग आणि खोल नातं आहे. आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या जवळ आहोत आणि एकमेकांचा खूप आदर करतो. त्यांच्यासारखं नातं पुन्हा कोणासोबत जमेल असं मला वाटलं नव्हतं.”
गौरीसोबतची भेट कशी झाली, याविषयी सांगताना आमिर पुढे म्हणाला, “गौरी आणि माझी भेट चुकून झाली आणि आमच्यात चांगली मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ते मलाही कळलं नाही. माझ्याकडे आई, मुलं, भावंडं आहेत, इतर अनेक जवळची नाती आहेत, त्यामुळे मला पार्टनर किंवा जोडीदाराची गरज नाही असं वाटलं होतं. पाणी फाऊंडेशनसाठी किरण आणि रीना अजूनही माझ्यासोबत काम करतात. आम्ही दररोज त्या कामासाठी भेटतो, बोलतो आणि एक कुटुंब म्हणून आमच्यात प्रेमाचा ओलावा आहे. आम्ही कायम एक कुटुंब म्हणून एकत्र राहू. आम्ही पती-पत्नी नसलो तरी एक कुटुंब नक्कीच आहोत. माझ्या आयुष्याचा आणि माझ्या कुटुंबाचा ते कायम भाग राहतील.”
“घटस्फोटानंतरही माझं किरणशी नातं खूप चांगलं आणि जवळचं आहे. मला आठवतंय आमचा घटस्फोट झाल्यानंतर आम्ही ‘लाल सिंग चड्ढा’च्या शूटिंगसाठी लडाखला गेलो होतो आणि तिथे गावातल्या लोकांनी आम्हाला त्यांच्या एका सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावलं होतं. तिथे आम्ही एकत्र नाचलो. आमचा एकत्र नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यावरून अनेकांनी सवाल उपस्थित केले होते. आताच घटस्फोट झाला आणि हे दोघं एकत्र नाचतायत, असे कमेंट्स त्यावर होते. पण आमचं नातं कसं आहे याचं स्पष्टीकरण मी लोकांना देऊ शकत नाही. आमचं बंध खूप खास आहे. लाल सिंग चड्ढाच्या शूटिंगदरम्यान तिने माझी खूप साथ दिली आणि लापता लेडीजच्या शूटिंगदरम्यान मी तिला खूप मदत केली. आमच्यातलं नातं खूप चांगलं आहे”, अशा शब्दांत आमिर व्यक्त झाला.
