मिठी नदी गाळ उपसा घोटाळाप्रकरणी डिनो मोरिया ईडी कार्यालयात; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..
मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यासाठी डिनो मोरिया आज सकाळी ईडीच्या कार्यालयात दाखल झाला आहे. याआधी त्याच्या घरी ईडीने छापे टाकले होते.

मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्याप्रकरणी कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून यामध्ये अभिनेता डिनो मोरियाचं नाव समोर आलं आहे. 65 कोटी रुपयांच्या या घोटाळ्याशी संबंधित चौकशीसाठी डिनो आज (गुरुवार) अंमलबजावली संचालनालयासमोर हजर झाला. ईडीने डिनोला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता तो दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट इथल्या ईडी कार्यालयात पोहोचला. यापूर्वी 12 जून रोजी डिनोची ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. शिवाय ईडीने 6 जून रोजी मुंबई आणि केरळमधल्या कोची इथल्या 15 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये वांद्रे परिसरातील डिनो मोरियाच्या घराचाही समावेश होता. या प्रकरणात डिनोसोबत त्याच्या भावाचंही नाव समोर आलं असून चौकशीसाठी तोसुद्धा हजर राहिला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी 1100 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं. एकूण 18 कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. त्यापैकी अनेकांची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी पालिकेचे 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आता ईडीनेही उडी घेतली आहे. कथित गैरव्यवहारसंबंधी आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू असून त्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याचं कळतंय.
याआधी डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो यांना काही कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं होतं. डिनो मोरिया हा शिवसेना (ठाकरे गट) युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्यात 2019 आणि 2022 या कालावधीत अनेक आर्थिक व्यवहार आहेत. त्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे.
