
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी या वर्षात गुड न्यूज दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल आई-बाबा बनले, कतरिनाने मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं पॅरेंट्स क्लबमध्ये सामील झालं आहे. विख्यात अभिनेता राजकुमार राव (RajKummarRao) आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही आता गुड न्यूज दिली आहे. ते दोघंही आई-बाबा बनले असून त्यांच्या घरी गोंडस बाळाचे आगमन झालं आहे. पत्रलेखा हिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे.
आमच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी देवाने आम्हाला हे सर्वात सुंदर गिफ्ट, आशिर्वाद दिलेत.. असं म्हणत त्यांनी मुलीच्या जन्माची सुखद बातमी पोस्ट केली आहे. आजच (15 नोव्हेंबर) त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या दिवशीच त्यांच्या लेकीचाही जन्म झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
थोड्या वेळापूर्वीच शेअर करण्यात आलेल्या या बातमीवर चाहते आणि इतर सेलिब्रिटींचे मिळून हजारो लाईक्स आले असून त्यांच्यावर शुभेच्छा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
काही महिन्यांपूर्वीच राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आई-बाबा होणार असल्याचे संकेत दिले होते. ‘ Baby on the Way’ असं लिहीलेला फोटो शेअर करत Elated अशी कॅप्शन लिहीत त्यांनी चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली. त्यानंतर आज, 15 नोव्हेंबर रोजी त्या दोघांनी घरी चिमुकल्या लेकीचे आगमन झाल्याची गुड न्यूजही शेअर केली. त्यावर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पडत दोघांनाही या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
राजकुमार राव-पत्रलेखा यांचं नातं
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणाऱ्या, अनेक चित्रपटात उत्तम काम करणारा अभिनेता अशी राजकुमार रावची ओळख आहे. अभिनेत्री पत्रलेखा हिनेही अनेक चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्या दोघांनी सर्वात पहिले, ‘सिटीलाइट्स’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.
मात्र सिटीलाईट्स मूव्हीनंतर ही जोडी चित्रपटात पुन्हा एकत्र दिसली नाही. ते जवळपास 11 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या काळात त्यांनी एकमेकांना चांगल्या आणि कठीण परिस्थितीत आधार दिला. अखेर 4 वर्षांपूर्वी, म्हणजे 15 नोव्हेंबर 2021 रोजी दोघांनी पारंपरिक बंगाली पद्धतीने चंदीगड येथे लग्नगाठ बांधली.