
कलाविश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. तरुण रंगभूमी कलाकर अदिती मुखर्जीचं रस्ते अपघातात निधन झाल्याची माहिती आहे. नोएडा इथल्या गौतम बुद्ध विद्यापीठात जात असताना तिच्या टॅक्सीला एका भरधाव कारने धडक दिली. या अपघातात अदिती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने ग्रेटर नोएडा इथल्या जवळच्या शारदा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. परंतु तिचे प्राण वाचू शकले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, अदिती एका नाट्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोएडाला जात होती. तिच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अदितीने प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांच्यासोबतही काम केलं होतं. अदितीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचे प्राण वाचू शकले नाहीत.
लोकप्रिय नाट्य दिग्दर्शक अरविंद गौर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित अदितीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘अस्मिता थिएटरची माजी विद्यार्थिनी अदिती मुखर्जी आता आपल्यात नाही. ग्रेटर नोएडा हायेववरील परी चौकजवळ झालेल्या एका अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. ती नाटक पाहण्यासाठी जात होती. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. ज्यातून खूप रक्तस्राव झाला होता. तिला तातडीने ग्रेटर नोएडा इथल्या शारदा रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डोक्याला गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचार सुरू होण्यापूर्वीच अदितीचा मृत्यू झाला’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पोलिसांनी अद्याप या अपघाताचं कारण पूर्णपणे तपासलेलं नाही. आशा आहे की ते लवकरच अपघातामधील कारण शोधतील आणि गुन्हेगाराला कडक शिक्षा करतील, ज्यामुळे अदितीच्या कुटुंबाला न्याय मिळू शकेल, असं त्यांनी पुढे म्हटलंय. अदितीबद्दल बोलताना त्यांनी लिहिलं, ‘अदिती ही अत्यंत प्रतिभावान आणि उत्साही अभिनेत्री होती. ती अस्मिता थिएटरच्या 2022 च्या बॅचची सक्रिय सदस्य होती. ती सध्या आशुतोष राणा आणि राहुल भुचर यांच्या ‘हमारे राम’ या नाटकात काम करत होती.’ अदितीचे आईवडील ओडिशाला राहतात. तिच्या अपघाताची माहिती मिळताच ते ओडिशाहून दिल्लीला आले आहेत.