Karisma Kapoor-Sunjay Kapur : संजय कपूरच्या संपत्तीचा धगधगता वाद , करिश्मा कपूर हिच्या मुलांची कोर्टात नवी मागणी

दिवंगत बिझनेसमन संजय कपूर याच्या मृत्यूला 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असून त्याच्या संपत्तीवरून पेटलेला वाद अद्याप कायम आहे. अलिकडेच, करिश्मा कपूरच्या मुलांनी त्यांच्या सावत्र आईने मृत्युपत्रात बनावट स्वाक्षरी केल्याचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला होता. आता, त्यांनी मृत्युपत्राबाबत एक नवीन याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी नवी मागणी केली आहे.

Karisma Kapoor-Sunjay Kapur : संजय कपूरच्या संपत्तीचा धगधगता वाद , करिश्मा कपूर हिच्या मुलांची कोर्टात नवी मागणी
संजय कपूरच्या संपत्तीचा वाद पेटलेलाच आहे
Image Credit source: social media
| Updated on: Nov 19, 2025 | 12:22 PM

भिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूर (Sunjay Kapoor) याचा जून महिन्यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कोट्यवधीच्या संपत्ती बाबत सुरू असलेला वाद जगजाहीर आहे. हा वाद अद्यापही पेटलेला असून दोन्ही पक्षाकडून सतत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेतच. यामुळे करिश्माच्या मुलांनाही अनेक दिवसांपासून कोर्टात खेपा घालाव्या लागत आहे. याचदरम्यान त्यांनी संजय याच्या मृत्युपत्राबाबत एक नवीन याचिका दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वी करिश्माच्या मुलांनी, संजय कपूरची तिसरी पत्नी आणि त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव ही खोटी आणि लोभी असल्याचा आरोप केला होता. तसेच तिने मृत्युपत्रावर बनावट सह्या केल्याचा आरोपही करण्यातआला होता. आता याच प्रकरणात एक नव वळण आलं आहे. करिश्माच्या मुलांनी आता प्रिया सचदेव हिच्याविरोधात एक नवी याचिका कोर्टात दाखल केली आहे, तसेच कोर्टात एक मोठी मागणीही केली आहे.

संपत्तीच्या वादात नवं वळण

दिवंगत बिझनेसमन संजय कपूर याच्या अफाट संपत्तीबाबत सुरू असलेल्या मोठ्या वादात दररोज काही ना काही नवीन अपडेट समोर येत आहेत. आता, या वादाला एक नवीन वळण मिळाले आहे. करिश्मा कपूरची मुलं, समायरा आणि कियान, यांची अशी मागणी आहे की, त्यांची सावत्र आई, प्रिया सचदेव हिने मालमत्तेपासून लांब रहावे, तिने त्यात काहीही छेडछडा करू नये. त्यामुळेच त्यांनी तिच्याविरुद्ध एक नवीन याचिका दाखल केली आहे. जोपर्यंत हे प्रकरण पूर्णपणे सोडवले जात नाही, तोपर्यंत प्रियाला संजयच्या मालमत्तेचे हस्तांतरण करण्याचा किंवा त्यात कोणताही बदल करण्याचा अधिकार देऊ नये  अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर उद्या म्हणजे 20 नोव्हेंबर रोजू पुढील सुनावणी होणार असून या मागणीवर कोर्ट काय निर्णय देत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

करिश्मा कपूरच्या मुलांनी चौकशीचीही केली होती मागणी

यापूर्वी, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांची मुलं समायरा आणि कियान यांनी 11 नोव्हेंबर रोजी कोर्टाकडे मूळ मृत्युपत्राची पडताळणी करण्याची विनंती केली होती, जे प्रियाने ऑक्टोबरमध्ये सादर केले होते. या मृत्युपत्रात अनेक विसंगती असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच त्यांनी या मृत्युपत्रातील सह्यांवरही आक्षेप घेतला, परंतु प्रियाने त्यांना विरोध केला. त्यानंतर, 17 नोव्हेंबर रोजी, जॉइंट रजिस्ट्रार यांनी समायरा आणि कियान यांच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी केली. जॉइंट रजिस्ट्रारनी प्रिया सचदेव आणि श्रद्धा सुरी मारवाह यांना तीन आठवड्यांच्या आत त्यांच्या आक्षेपांवर लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. आता या खटल्याची सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे. करिश्मा कपूर आज या कायदेशीर लढाईत सहभागी नसली तरी, ती समायरा आणि कियान या तिच्या मुलांच्या वतीने न्यायालयात उपस्थित राहते.