
झमगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्या अभिनेत्रीची तुलना हेलन यांच्यासोबत व्हायची, त्या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्री मधुमती यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं आहे. पण त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्या निधनामुळे सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.
अभिनेते विंदू दारा सिंग यांनी मधुमती यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘त्या (मधुमती) आमच्या शिक्षिका, मैत्रीण, मार्गदर्शक होत्या आणि फक्त मीच नाही तर, अक्षय कुमार, तब्बू यांसारखे असंख्य जण त्यांचे विद्यार्थी होते. त्या आमच्यापैकी बहुतेकांशी संपर्कात होत्या आणि प्रेम आणि काळजीने भरलेले निरोगी जीवन जगत होत्या… आज सकाळी आम्ही सर्वांनी आमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. त्या सकाळी उठल्या आणि एक ग्लास पाणी पिऊन कायमच्या झोपी गेली!.. मधुमती यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मधुमती यांचं लग्न…
अभिनया शिवाय मधुमती यांचे डान्स क्लासेस देखील होते. त्यांनी महिलांसोबत डान्स ग्रुप देखील तयार केलेला. तर दुसरीकडे, मनोहर दीपक यांचं हिंदी सिनेविश्वात मोठं नाव झालेलं होतं. त्यांनी मधुमती यांना सोबत काम करण्यास सांगितलं. सुरुवातीला मधुमती यांनी नकार दिला. अखेर दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली.
चार मुलांच्या बापासोबत लग्न…
मनोहर दीपक हे मधुमतीयांच्या पेक्षा वयाने खूप मोठे होते. दीपक विवाहित देखील होती. एवढंच नाही तर त्यांना चार मुलं होती. त्यांच्या पत्नीला हृदयविकार होता, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे, मधुमती यांच्या आईला दीपक आवडायचे पण ते मुलीचं लग्न त्यांच्यासोबत करण्यास तयार नव्हते. असं असताना देखील वयाच्या 19 व्या वर्षी मधुमती यांनी दीपक यांच्यासोबत लग्न केलं.
हेलन यांच्यासोबत व्हायची तुलना
मधुमती यांची तुलना हेलन यांच्यासोबत व्हायची… याबद्दल खुद्द मधुमती एकदा म्हणालेल्या, ‘आम्ही दोघी मैत्रिणी होतो. हेलन सिनियर होत्या. दिसायला आम्ही दोघी सारख्या दिसायचो… लोक कायम आमची तुलना करायचे… पण याचा आम्हाला कधीच त्रास झाला नाही. मी हेलन यांच्यासोबत काही गाण्यांमध्ये काम केलं.’ असं मधुमती म्हणालेल्या.