आई-बहिणीवरून शिव्या, सेटवर दिग्दर्शकाकडून शिवीगाळ, नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा; पैसे हवे म्हणून..

सेटवर एका दिग्दर्शकाने मला शिव्या दिल्या होत्या. इच्छा नसतानाही मी अशी अनेक कामं केली ज्याबद्दल मला काहीही वाटत नाही. मी तिथे अडकले होते, असं सांगत नीना गुप्ता यांनी सेटवर मिळालेला वेदनादायक अनुभव कथन केला.

आई-बहिणीवरून शिव्या, सेटवर दिग्दर्शकाकडून शिवीगाळ, नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा; पैसे हवे म्हणून..
नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा
| Updated on: Feb 09, 2026 | 9:08 AM

बॉलिवूडमधील सर्वात बेधडक आणि शानदार, उत्तम अभिनेत्री असलेल्या नीना गुप्ता यांचं आयुष्य, त्यांचे स्ट्रगल बऱ्याच लोकांना माहीत आहेत. पण नुकतच त्यांनी आयुष्यातील काही अशा घटनांबद्दल सांगितलं जे ऐकून कोणीही हैराण होईल. माझी इच्छा नसतानाही मला छोट्या आणि काही वेळा खराब भूमिकाही कराव्या लागल्या. एवढंच नव्हे तर सेटवर प्रचंड गैरवर्तन सहन करावं लागलं, शिव्याही ऐकाव्या लागल्याच धक्कादायक खुलासा त्यांनी केला. मी माझ्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट केले आहेत ज्यांबद्दल मला काहीच प्रेम,आपुलकी वाटत नाही असंही त्या म्हणाल्या. “अनेकदा मी घरी येऊन देवाला प्रार्थना करायचे की तो चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ नये” असाही मोठा खुलासा त्यांनी केला.

काय म्हणाल्या नीना गुप्ता ?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता यांनी चित्रपटाच्या सेटवरील वागणुकीबद्दल अनेक गोष्टी उलगडल्या. ‘एका चित्रपटात, मी शक्ती कपूरच्या टोळीची फक्त एक अनामिक सदस्य होते, तिथे माझं काम म्हणजे, फक्त बाजूला उभं राहणं होतं’. मी अशा गोष्टी, अशी कामं केली, पण ती मनापासून नव्हे. परिस्थितीमुळे मला या गोष्टी करणं भाग पडलं, असंही त्यांनी नमूद केलं.

चित्रपटाच्या सेटवर ऐकाव्या लागल्या शिव्या

एवढंच नव्हे तर चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाकडून चुकीची वागणूक मिळाल्याची आठवणही त्यांनी सांगितली. ‘ तुम्ही कधी विचारही करू शकणार नाही, पण सेटवर मला शिव्या देण्यात आल्या.  काहीही चूक नसताना मला आई-बहिणीवरून शिव्या ऐकाव्या लागल्या. दिग्दर्शकानेच ते शब्द वापरले होते. पण मी तिथे अडकले होते, कारण मला पैसे (कमवायचे) होते ना. जर दुसरं काही (काम) मिळालं असतं तर मी हे नक्कीच केलं नसतं ‘ असंही त्यांनी सांगितलं.

अलीकडेच मला काही प्रोजेक्ट्स दिग्दर्शित करण्याची ऑफर मिळाली होती, पण सध्या मला त्या क्षेत्रात जायचं नाही, कारण मला वाटतंय की माझी अभिनय कारकीर्द चांगली चालली आहे. मला त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे असं पुढे त्या म्हणाल्या.

कोणकोणत्या चित्रपटातं केलं काम ?

गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या नीना गुप्ता यांनी कित्येत चित्रपटांत काम केलंय. त्यामध्ये ‘साथ साथ’, ‘गांधी’, ‘जाने भी दो यारों’, ‘मंडी’, ‘घर जमाई’, ‘खलनायक’, ‘एंथ’ आणि ‘मेरी बीवी का जवाब नहीं’ यांचा समावेश आहे. तर गेल्या काही वर्षांत त्यांनी ‘वीरे दी वेडिंग’, ‘मुल्क’, ‘बधाई हो’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’, ‘संदीप’ आणि ‘पिंकी फरार’, ’83’, ‘मिसेज चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’, ‘मेट्रो इन दिनों’ तसेच ‘तू मेरी मैं तेरा…’ या चित्रपटांतही त्या दिसल्या होत्या.

टीव्ही आणि ओटीटीवर त्यांनी ‘खानदान’, ‘गुल गुलशन गुलफाम’, ‘चाणक्य’, ‘जुनून’, ‘सांस’, ‘सोन परी’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘मेड इन हेवन’, ‘पंचायत’, ‘मसाबा मसाबा’ आणि ‘चार्ली चोप्रा’ सारख्या शोमध्येही काम केलं. नुकत्याच त्या ‘वध 2’ चित्रपटात दिसल्या होत्या.