Adipurush: ‘आदिपुरुष’विरोधात विश्वहिंदू परिषदची धमकी; म्हणाले “थिएटरमध्ये.. “

'आदिपुरुष'च्या निर्मात्यांसमोर नवी अडचण

Adipurush: आदिपुरुषविरोधात विश्वहिंदू परिषदची धमकी; म्हणाले थिएटरमध्ये..
Adipurush
Image Credit source: Youtube
| Updated on: Oct 06, 2022 | 1:31 PM

मुंबई- ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटावरून सुरू असलेला वाद काही थांबत नाहीये. 2 ऑक्टोबर रोजी अयोध्येत या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. हा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यापासून त्यावरून जोरदार वाद सुरू आहे. या चित्रपटातील VFX आणि त्यातील भूमिकांच्या लूकवरून एकीकडे ट्रोलिंग सुरू आहे. तर दुसरीकडे त्यातील दृश्ये आणि पोस्टरवर कॉपी केल्याचा आरोप होत आहे. अशातच आता विश्वहिंदू परिषदने (Vishva Hindu Parishad) या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात इशारा दिला आहे. आदिपुरुष हा चित्रपट थिएटरमध्ये चालू देणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

आदिपुरुषचा टीझर पाहिल्यानंतर निर्माते-दिग्दर्शकांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. रामायण या पौराणिक कथेवर हा चित्रपट आधारित आहे. मात्र रामायणातील अनेक पात्रांचा लूक चित्रपटात अत्यंत वेगळा दाखवल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली. रावण, हनुमान यांसारख्या पात्रांचा लूक प्रेक्षकांना पटला नाही.

विश्वहिंदू परिषदचे विभाग प्रचार प्रमुख अजय शर्मा यांनी आदिपुरुष हा चित्रपट कोणत्याच सिनेमा हॉलमध्ये चालू न देण्याची धमकी दिली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांनी हा चित्रपट चालू न देण्याची भूमिका घेतली आहे.

टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत अजय शर्मा म्हणाले, “आदिपुरुषच्या टीझरमध्ये हिंदू समाजविरोधात खिल्ली उडवली गेली. विहिंप आणि हिंदू समाज अशा गोष्टी खपवून घेणार नाही. आम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये चालू देणार नाही. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी आम्ही ते करू.”

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदिल कसा दिला, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “सेन्सॉर बोर्ड नेमकं काय करतंय? सेन्सॉर बोर्ड हा सरकारच्या वर नाही. सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारावी की नाही हा त्याचा प्रश्न आहे. पण जर त्याला रावण साकारायचा असेल तर तो हिंदू धर्मग्रंथांनुसारच साकारावा. अन्यथा त्यांनी परिमाण भोगण्यास तयार राहावं”, असं ते म्हणाले.