
‘मस्ती’, ‘ग्रँड मस्ती’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘हंगामा’ यांसारख्या चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आफताब शिवदासानी सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. आफताब लवकरच ‘मस्ती 4’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त दिलेल्या या मुलाखतीत तो त्याच्या करिअर आणि त्याच्याशी संबंधित पसरलेल्या अफवांवर मोकळेपणे व्यक्त झाला. आफताब ड्रग्ज घेत असल्याचीही एकेकाळी चर्चा होती. यावर त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत सेटवरील त्याच्या वागणुकीवरही बरीच टीका झाली होती. त्यावरही आफताबने स्पष्टीकरण दिलं आहे. झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आफताबने सांगितलं की, त्याने या सर्व आरोपांकडे कधीच गांभीर्याने पाहिलं नाही.
“माझ्याबद्दल पसरलेली ती सर्वांत मजेशीर अफवा होती. हे पहा, मी आयुष्यात खूप आधीच एक गोष्ट शिकली होती की, सत्याचा गोंगाट कधीच नसतो. सत्य नेहमीच शांत असतं. सत्याला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नसते. हीच गोष्ट लक्षात ठेवून मी कोणत्याच चर्चांना किंवा अफवांना खरं ठरवणार नाही”, असं तो म्हणाला. आफताबने आजवर कोणत्याच मुलाखतीच्या माध्यमातून स्वत:ची बाजू मांडली नव्हती. यामागचं कारण हेच होतं की, जे सत्य आहे त्याला वारंवार सिद्ध करायची गरज लागत नाही, या मताचा तो आहे.
याविषयी तो पुढे म्हणाला, “मी कधीच स्वत:विषयी ऑन रेकॉर्ड काहीच बोललो नाही. मी त्या सर्व गोष्टी इथेच ऐकतो आणि इथूनच डोक्यातून काढून टाकतो. कारण जे सत्य नाही, त्यासाठी मी माझी झोप का उडवून घेऊ? माझं सत्य काय आहे, हे मला माहीत आहे. जी लोकं महत्त्वाची आहेत, जवळची आहेत, त्यांना माझं सत्य माहीत आहे. मी तसं केलं असो किंवा नसो, जर लोकांना असं वाटत असेल की मी केलंय, तर ते तसंच ऐकतील. मग मी छतावर उभा राहून ओरडलो की, मी तसं काही केलं नाहीये, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.”
सेटवर बेजबाबदारपणे वागल्याचाही आरोप आफताबवर झाला होता. याविषयी बोलताना त्याने सांगितलं, “ही इंडस्ट्री खूप निर्दयी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, माझे शत्रू खूप होते. अनेकजण माझ्याविषयी वाईट बोलायचे. मला असं वाटतं की, मी असं नाव कमावलंय, जिथे लोक मला पसंत करत नाहीत, परंतु माझा द्वेष करतात. कारण ते मला पूर्णपणे ओळखत नाहीत. माझी ही प्रतिमा मी जाणूनबुजून कायम ठेवली आहे. त्याला बदलण्याचा प्रयत्न केला नाही.” फिल्म इंडस्ट्रीत राहुल देव सोडला तर दुसरा कोणीच मित्र नाही, असंही आफताबने स्पष्ट केलं. 2001 पासून तो आणि राहुल देव मित्र आहेत.