अरिजीत सिंगनंतर श्रेया घोषालसुद्धा घेणार गायनातून संन्यास? म्हणाली..

जानेवारी 2026 मध्ये अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंगमधून संन्यास घेण्याची घोषणा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायिका श्रेया घोषालनेही अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं आहे.

अरिजीत सिंगनंतर श्रेया घोषालसुद्धा घेणार गायनातून संन्यास? म्हणाली..
Shreya Ghoshal and Arijit Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 16, 2026 | 4:42 PM

एकीकडे प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या संन्यास घेण्याच्या निर्णयावर अद्याप चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये, इतक्यात दुसरीकडे प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनेही अशाच निर्णयाकडे इशारा केला आहे. 42 वर्षीय श्रेयाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी मोकळेपणे वक्तव्य केलं आहे. लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवर लिप सिंकिंग करण्यावर मी कधीच अवलंबून राहत नसल्याचं तिने म्हटलंय. ज्या दिवशी असं काही करण्याची वेळ येईल, त्यादिवशी मी गायन सोडून देईन, असं तिने थेट म्हटलं आहे. पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या श्रेया घोषालने असंही म्हटलंय की कधीकधी ब्रेक घेण्याची तिचीही इच्छा होते. ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत श्रेया म्हणाली, “मला लिप सिंकिंग ही गोष्टच खूप विचित्र वाटते. ज्या दिवशी मला असं काही करणं भाग पडेल, त्या दिवशी मी गायन बंद करेन.”

श्रेया घोषालने अरिजीत सिंगच्या निवृत्तीच्या निर्णयाचं कौतुक करत हे धाडसी पाऊल असल्याचं म्हटलं आहे. याविषयी ती पुढे म्हणाली, “कधी कधी मलाही ब्रेक घ्यावासा वाटतो. त्याने हा निर्णय खूप धाडसाने घेतला आहे. अरिजीत हा संगीताशी खोलवर जोडलेला माणूस आहे. तो संगीत का बनवतो किंवा त्यातून काय मिळेल याचा विचार करत नाही. तो फक्त तेच करतो जे त्याला आनंद देतं. त्याच्यासाठी संगीत हे सर्व गोष्टींपेक्षा मोठं आहे आणि म्हणूनच लोक त्याला इतकं प्रेम करतात.”

“एंटरटेनर म्हणून आपल्या वैयक्तिक जीवनात येणाऱ्या अडचणी परफॉर्मरने स्टेजवर कधीच प्रतिबिंबित होऊ देऊ नयेत. लोक संगीत आणि प्रेरणा घेण्यासाठी आपल्याकडे येतात. संगीत त्यांना शांत करतो आणि त्यांच्या त्रासातून बाहेर पडण्यास मदत करतं. प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम हेच आम्हाला सादरीकरण करण्यास प्रेरित करतं. त्यामुळे जेव्हा तुमचं मन आनंदी असतं तेव्हा ती ऊर्जा नैसर्गिकरित्या येते. माझ्यासाठी टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांशी संवाद हा प्रेरणाचा सर्वात मोठा स्रोत आहे,” अशा शब्दांत श्रेया व्यक्त झाली.

श्रेया घोषालने तिच्या कारकीर्दीत आत्तापर्यंत 3000 हून अधिक गाणी गायली आहेत. यामध्ये हिंदीमध्ये 1160, बंगालीमध्ये 338, कन्नडमध्ये 315, तेलुगूमध्ये 284, तमिळमध्ये 219, भोजपुरीमध्ये 81, मल्याळममध्ये 112 आणि मराठीमध्ये 74 गाणी गायली आहेत.

Follow Us