
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन कायमच चित्रपटांमध्ये धमाकेदार अभिनय करताना दिसतो. मात्र, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळण्यासाठी त्याला तब्बल 25 वर्ष लागली. वडील अमिताभ बच्चन यांच्या पावलावर पाऊल टाकत 25 वर्षांपूर्वी अभिषेकने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. नुकताच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिषेक बच्चन हा चांगलाच भावूक झाल्याचे बघायला मिळाले. ”आय वॉन्ट टू टॉक” चित्रपटासाठी त्याला पुरस्कार मिळाला. या चित्रपटात अभिषेक बच्चन याच्यासोबत कार्तिक आर्यन हा देखील महत्वाच्या भूमिकेत दिसला.
पुरस्कार सोहळ्यावेळी नाव जाहीर झाल्यानंतर अभिषेक बच्चन याला विश्वास बसला नाही. पुरस्कार घेण्यासाठी मंचावर जात असताना अभिषेक भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहरा बरेच काही सांगून जात होता. पुरस्कार मिळाल्यानंतर भावना मांडताना त्याचा आवाजही जड झाला. याकरिता 25 वर्षांचा मोठा कालावधी लागला. मला आठवते की, मी कितीतरी वेळा अगोदरच पुरस्कार मिळाल्यानंतरचे भाषण तयार करून ठेवायचो. मात्र, पुरस्कार मिळत नसे.
हे एक माझे स्वप्न होते. मला आज खूप वेगळे आणि भावनिक वाटतंय. ऐश्वर्या आणि आराध्या, माझे स्वप्न पूर्ण करून दिल्याबद्दल तुमच्या दोघींचे खूप आभार. तुमच्या पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद, असे अभिषेकने म्हटले. मला नक्कीच विश्वास आहे की, माझा हा पुरस्कार पाहून तुम्हाला खात्री होईल की, तुमची मेहनत वाया गेली नाही. तुमच्या दोघींशिवाय मी इथपर्यंत नक्कीच पोहोचू शकलो नसतो.
अभिषेक बच्चन याने केलेल्या या भावनिक विधानानंतर ऐश्वर्या राय हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ऐश्वर्या अलीकडेच पॅरिस फॅशन वीक 2025 मध्ये सहभागी झाली होती. अभिषेक बच्चन याला पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्याने खास फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ऐश्वर्याने काही शांत आणि गंभीरही पोज दिल्याचेही बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय हिने ही पोस्ट अभिषेक बच्चन याच्यासाठी शेअर केल्याचा दावा केला जात आहे. चाहते यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.