पठानों से कहना, चौहान आ रहा है..; म्हणणाऱ्या अजय देवगणवर क्षत्रिय समाज नाराज; म्हणाले ‘राजकीय तमाशासाठी..’

अजय देवगणचा आगामी 'चौहान' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. क्षत्रिय परिषदेनं या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात राजपुतांचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पठानों से कहना, चौहान आ रहा है..; म्हणणाऱ्या अजय देवगणवर क्षत्रिय समाज नाराज; म्हणाले राजकीय तमाशासाठी..
चौहान चित्रपट (अजय देवगण)
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2026 | 11:17 AM

नीरज यादव दिग्दर्शित ‘चौहान’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांतच त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटावर क्षत्रिय परिषदेनं आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात राजपूत इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर आणि राजपूत अस्मिता बळकावण्याच्या कथित प्रयत्नांवर या परिषदेनं सडकून टीका केली आहे. असे प्रयत्न निवडणुकीच्या किंवा वैचारिक हेतूंसाठी केले जातात, असाही आरोप क्षत्रिय परिषदेनं केला आहे. सध्याच्या जातीय राजकारणासाठी चौहान घराण्याच्या नावाचा वापर केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या चित्रपटाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

चौहान हे एक ऐतिहासिक राजपूत (क्षत्रिय) घराणं आहे, ज्यांचा वारसा इतिहासात रुजलेला आहे. हे घराणं कोणत्याही पक्षपाती विचारांमध्ये किंवा माध्यमांनी पेटवलेल्या वादांमध्ये अडकलेलं नाही”, असं परिषदेनं म्हटलंय. यासंदर्भात सोशल मीडियावर एक निवेदत पोस्ट करण्यात आलं आहे. राजपूत अस्मितेला पुन्हा एकदा राजकीय कथानकात ओढलं जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलंय.

क्षत्रिय परिषदेचं निवेदन-

यामध्ये पुढे लिहिलंय, ‘ज्यावेळी मुख्य प्रवाहाताील माध्यमे आणि सार्वजनिक चर्चेत राजपूत आवाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही, अशा वेळी फक्त संताप भडकवण्यासाठी, जातीय आणि सांप्रदायिक भावनांना चिथावणी देण्यासाठी किंवा राजकीय तमाशा करण्यासाठी राजपूत वंशाच्या नावाचा वापरण करणं हे बेजबाबदार आणि अपमानकारक आहे. अशा चित्रणांमधून भारतीय इतिहासाविषयीचं अज्ञान दिसून येतं.’ या पोस्टमध्ये क्षत्रिय परिषदेनं अफगाण आणि राजपूत एकत्र लढल्याचीही उदाहरणे दिली आहेत.

‘चौहान’चा टीझर-

आम्ही राजकीय व्यक्ती, चित्रपट निर्माते आणि प्रसारमाध्यमांना आवाहन करतो की, त्यांनी राजपूत वारशाचा वापर विभाजनकारी राजकीय वादासाठी इंधन म्हणून वापर करण्याऐवजी भारताच्या भूतकाळाकडे जबाबदारीने पहावं आणि त्याच्या ऐतिहासिक गुंतागुंतीचा आदर करावा, असं यामध्ये म्हटलं आहे. अजय देवगणच्या ‘चौहान’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर टीका झाली होती. त्यातील डायलॉग आणि दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. अभिनेत्री स्वरा भास्करसह अनेकांनी हा टीझर असंवेदनशील असल्याचं म्हणत त्याचा निषेध केला होता.

टीझरमधील अजय देवगणच्या ‘पठानों से कहना, चौहान आ रहा है..’ या डायलॉगलाही तीव्र विरोध झाला. या डायलॉगमधून मुस्लिमांना खलनायक ठरवलं जात असल्याचा आरोप काहींनी केला आहे. काश्मीरमधील संघर्षाचं चित्रण आणि त्याचप्रमाणे पॅलेट गनमुळे कमीत कमी नुकसान होतं, या दाव्यावरही टीका झाली होती. ‘तुम्हाला अशा प्रकारे बॉलिवूडचा गौरव करायचा आहे का? पॅलेट गनमुळे मर्यादित नुकसान होत नाही, तर ते मानवाधिकारांचं घोर उल्लंघन आहे. सर्वसामान्य काश्मिरी पठाण नाहीत. जरा संशोधन करा,’ अशी पोस्ट स्वराने केली होती.

Follow Us