एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, शिंदे गटाच्या मंत्र्याची इच्छा; कोण काय काय बोललं?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिंदे गटाच्या नेत्यांची उघड इच्छा आहे. प्रताप सरनाईक, प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक आमदारांनी ही मागणी केली आहे. मात्र, भाजप नेते प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीसच 2029 पर्यंत मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी उघड इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या मागणीला आज प्रताप सरनाईक यांनी पाठिंबा दिला आहे. जाधव आणि सरनाईक यांच्या पाठोपाठ प्रकाश सुर्वे आणि भरत गोगावले यांनीही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर, भाजप नेते प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस हेच 2029 पर्यंत मुख्यमंत्रीपदी राहतील, असं स्पष्ट केलं आहे.
शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवला आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, असं विधान केलं. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाजपचं संख्याबळ अधिक असल्याने मुख्यमंत्रीपद भाजपकडे असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. भविष्यात शिवसेनेचे आमदार आणि खासदार अधिक संख्येने निवडून आल्यास मुख्यमंत्रीपदावर शिवसेना दावा करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. आता प्रताप सरनाईकांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जाधव काय म्हणाले होते?
शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांना दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, असं प्रतापराव जाधव म्हणाले होते.
सुर्वे म्हणाले, त्यात गैर काय?
केवळ प्रतापराव जाधव आणि प्रताप सरनाईक यांनीच नव्हे तर शिंदे गटातील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिवसेनेचा आमदार प्रकाश सुर्वे यांनीही प्रतापराव जाधवांच्या सूरात सूर मिसळले आहेत. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपल्या नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. आमच्या लोकांनी जर इच्छा ठेवली तर त्याच्यामध्ये गैर काय आहे? असा सवाल प्रकाश सुर्वे यांनी केला.
शिंदे मनातले मुख्यमंत्री
राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनीही शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं म्हटलं आहे. यापूर्वी जे त्यांनी काम केलंय, त्या कामाच्या आधारावरच त्यांना जनतेने मनातलं केलेलं आहे. आता पुढचं बघू काय आहे ते. एकनाथ शिंदेंना लोकांनी मनातले मुख्यमंत्री केलं आहे, असं सांगतानाच मात्र सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असंही गोगावले म्हणाले.
फडणवीसच झेंडा वंदन करतील
भाजप नेते प्रसाद लाड यांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे हे चांगले मुख्यमंत्री होते. त्यांनी चांगलं काम केलं. पण आत्ता फडणवीस चांगले मुख्यमंत्री आहेत. प्रतापराव जाधव यांची ती भावना असू शकते. पण आज देवेंद्र फडणवीस मंत्रालयात झेंडा वंदन करत आहेत आणि 2029 पर्यंत तेच झेंडा वंदन करतील, असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय.
