
सोशल मीडिया आणि AI च्या मदतीने हल्ली कोणाचेही व्हिडीओ एडिट केले जाऊ शकतात. परंतु अनेकांकडून या फिचर्सचा चुकीचाही वापर केला जातो आणि सेलिब्रिटींना त्याचा सर्वाधिक फटका बसतो. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो महर्षी वाल्मिकींच्या भूमिकेत दिसला होता. या व्हायरल व्हिडीओवर अक्षयने तीव्र नाराजी व्यक्त करत थेट कोर्टात धाव घेतली होती. आपल्या व्यक्तीमत्त्व अधिकारांच्या सुरक्षेसाठी त्याने कोर्टात मदत मागितली होती. याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने अक्षयला मोठा दिलासा दिला. अक्षय कुमारच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचं उल्लंघन करणारा डीपफेक AI कंटेंट काढून टाकण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अज्ञात व्यक्ती आणि काही ई-कॉमर्स साइट्सविरुद्ध न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
असा कंटेंट केवळ अभिनेत्याच्या हितासाठीच नव्हे तर समाजहितासाठी देखील सार्वजनिक डोमेनमधून त्वरित काढून टाकणं आवश्यक आहे, असं न्यायाधीशांनी नमूद केलं. “अनेक प्रकरणात एआयचा वापर करून तयार केले जाणारे डीपफेक फोटो आणि व्हिडीओ खरोखरच चिंताजनक आहे. हे मॉर्फिंग इतकं फसवं आहे की अक्षय कुमारचे खरे फोटो आणि व्हिडीओ आणि डीपफेक यांच्यात फरक ओळखणं जवळपास अशक्य आहे. अशा व्हिडीओंमुळे फक्त अक्षयच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेवरही गंभीर धोका निर्माण होतो” असं ते म्हणाले.
अक्षय कुमारने याआधी सोशल मीडियाद्वारे त्याच्या डीपफेक व्हिडीओबद्दल नाराजी व्यक्त केली होती. “एआयच्या मदतीने माझा एडिट केलेला व्हिडीओ मी पाहिला. त्यामध्ये मला महर्षी वाल्मिकी म्हणून दाखवण्यात आलं आहे. परंतु मी हे स्पष्ट करू इच्छितो की हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. एआयच्या मदतीने तो तयार करण्यात आला आहे. सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे मीडियानेही तो व्हिडीओ सरसकट वापरून त्यावरून बातम्या केल्या आहेत. मी सर्वांना विनंती करतो की अशा बातम्या प्रकाशित करण्यापूर्वी कृपया आधी त्याची सत्यता पडताळून पाहा”, असं त्याने म्हटलं होतं.
गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी आपल्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन यांचाही समावेश आहे. आपल्या फोटो आणि व्हिडीओंचा गैरवापर होऊ नये, म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं आहे.