
अभिनेता अक्षय कुमारने गेल्या सात महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आठ प्रॉपर्टी विकले आहेत. या सर्व प्रॉपर्टीतून त्याने 110 कोटी रुपये मिळवले आहेत. यामध्ये आलिशान अपार्टमेंट्स आणि बोरिवली, वरळी, लोअर परळ इथल्या कमर्शिअल ऑफिस जागेचाही समावेश आहे. अक्षयने इतकी प्रॉपर्टी का विकली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावरून विविध प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. अक्षय मुंबई सोडून दुसरीकडे राहण्याचा विचार करतोय की काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याने विकलेल्या या प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत, ते पाहुयात.
अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवलीमधील 3BHK अपार्टमेंट 21 जानेवारी 2025 रोजी 4.25 कोटी रुपयांना विकला होता. ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये हा अपार्टमेंट होता. अक्षयने नोव्हेंबर 2017 मध्ये 2.38 कोटी रुपयांना हे अपार्टमेंट विकत घेतलं होतं.
अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी 31 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील वरळी इथल्या ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट प्रोजेक्टमधील आलिशान अपार्टमेंट विकलं. तब्बल 80 कोटींना ही प्रॉपर्टी विकण्यात आली. इमारतीच्या 39 व्या मजल्यावर हे घर होतं. त्यासोबत चार पार्किंग स्लॉटसुद्धा विकण्यात आले.
या वर्षी मार्च महिन्यात अक्षयने बोरिवली पूर्व इथल्या ओबेरॉय स्काय सिटीमधील अपार्टमेंट 4.35 कोटी रुपयांना विकलं. यामध्ये दोन पार्किंग स्लॉटचाही समावेश होता.
मार्च महिन्यातच त्याने ओबेरॉय स्काय सिटीमधील दोन अतिरिक्त अपार्टमेंट एकत्रित 6.60 कोटी रुपयांना विकलं. 2017 मध्ये खरेदी केलेल्या या दोन्ही मालमत्तांमधून गुंतवणुकीवर 89 टक्के परतावा मिळाला.
मुंबईतील लोअर परळ इथली कमर्शिअल जागा त्याने एप्रिल महिन्यात 8 कोटी रुपयांना विकली. ही जागा अक्षयने 2020 मध्ये 4.85 कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यावर त्याला 65 टक्के परतावा मिळाला.
अक्षय कुमारने 16 जुलै 2025 रोजी ओबेरॉय स्काय सिटीमधील दोन शेजारील निवासी अपार्टमेंट्स 7.10 कोटी रुपयांना विकलं. हे दोन्ही अपार्टमेंट्स त्याने 2017 मध्ये 3.69 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.