ही तर दुसरी जया बच्चन..; आलिया भट्टच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
जया बच्चन यांच्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती पापाराझींवर चिडताना दिसून आली आहे. ही तुमची बिल्डिंग नाही, इथून बाहेर जा.. असं ती त्यांना म्हणतेय.

अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता आलिया तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ती पापाराझींवर चिडताना दिसून येत आहे. आलियाच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत पापाराझी कल्चर मोठ्या प्रमाणात वाढलंय. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी हे पापाराझी फोटो आणि व्हिडीओ क्लिक करण्यासाठी सेलिब्रिटींचा पाठलाग करतात. हीच गोष्ट काहींना अजिबात आवडत नाही. खासगी आयुष्यात प्रमाणापेक्षा अधिक होणारी ढवळाढवळ पाहून सेलिब्रिटी अनेकदा चिडचिड करताना दिसतात. अशीच काहीशी गोष्ट आलियासोबत घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आलिया पिकलबॉल या खेळाचा सराव करतेय. याच खेळाच्या आऊटफिटमध्ये आलिया तिच्या कारमधून उतरली आणि चालत एका इमारतीत जाऊ लागली होती. यावेळी काही पापाराझी तिच्या मागून इमारतीच्या आत शिरण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून आलिया त्यांच्यावर चिडली. “गेटच्या आत येऊ नका, ही तुमची इमारत नाही. कृपया बाहेर जा, कृपया बाहेर जा. तुम्ही सर्वजण इथून बाहेर जा. ही इमारत तुमची नाही. तुम्ही आत येऊ शकत नाही. तुम्हाला ऐकू येत नाहीये का”, अशा शब्दांत ती त्यांच्यावर नाराजी व्यक्त करते. आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
View this post on Instagram
याआधी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये त्यांच्याजवळ एक व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी येते. परंतु जया बच्चन त्या व्यक्तीला धक्का देऊन ओरडतात. त्यांच्या अशा वागणुकीवर नेटकऱ्यांकडून जोरदार टीका होत आहे. अशातच आलियाचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्यामुळे ‘ही दुसरी जया बच्चन’ अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर काहींनी आलियाची बाजू घेतली आहे. ती अत्यंत संयमाने त्यांना समजावतेय, यात तिचं काहीच चुकलं नाही, असं तिच्या चाहत्यांनी म्हटलंय. प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रत्येक सेलिब्रिटीचा अहंकार वाढतो आणि मग ते असं वागतात, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.
आलियाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच ‘अल्फा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असेल. ‘वॉर’ आणि ‘पठाण’ यांसारख्या चित्रपटांसारखीच याची रचना असेल. याशिवाय ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव अँड वॉर’मध्येही झळकणार आहे. यामध्ये ती पती रणबीर कपूर आणि अभिनेता विकी कौशल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
