
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अली गोणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. गणेशोत्सवादरम्यान ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याने त्याच्यावर प्रचंड टीका केली जातेय. इतकंच नव्हे तर जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत असल्याचा खुलासा अलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. या धमक्यानंतर आता अलीने थेट इशारा दिला आहे. माझ्या गर्लफ्रेंडबद्दल किंवा कुटुंबीयांबद्दल काहीही बरंवाईट म्हटलेलं मी खपवून घेणार नाही, असं तो म्हणाला. पंजाबी अभिनेत्री जास्मीन भसीनला तो डेट करतोय. धर्मावरून या दोघांच्या नात्यावर अनेकदा टीका झाली आहे.
‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत अली म्हणाला, “मला जीवे मारण्याच्या धमक्या भरभरून दिल्या जात आहेत. धमक्यांनी माझं ईमेल भरलंय. माझ्या पोस्टवर तेच कमेंट्स आहेत. माझ्याविरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी काहीजण करत आहेत. पण कशासाठी? मी खूप साधी गोष्ट सांगतो की, मी मुस्लीम आहे, म्हणून माझ्यावर हे लादलं जातंय. पण बरेच असे हिंदू आहे, जे घरात गणपती आणत नाहीत. मग ते हिंदू नाहीत का?”
“हे धमक्या देणारे जे लोक आहेत किंवा जास्मीनला शिवीगाळ करणारे आहेत, त्यापैकी एकाकडेही हिंमत असेल तर माझ्या समोर येऊन बोलावं. देवाशपथ मी गळा कापून हातात देईन. माझी आई, बहीण किंवा जास्मीनबद्दल कोणीही बरंवाईट म्हटलं तर ते मी अजिबात सहन करणार नाही”, असा थेट इशाराच अलीने ट्रोलर्सना दिला आहे.
याआधी अलीने स्पष्ट केलं होतं की तो ‘गणपती बाप्पा मोरया’ का म्हणाला नव्हता? “मी पहिल्यांदाच गणेशोत्सवात सहभागी झालो होतो. त्यामुळे पूजा कशी केली जाते, काय करायचं असतं हे मला काहीच माहीत नाही. मी माझ्याच धुंदीत होतो. परंतु मी प्रत्येक धर्माचा आदर करतो. कुराणात लिहिलंय की प्रत्येक धर्माचा केला पाहिजे.”
अली गोणीने ‘ये है मोहब्बतें’, ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या मालिका आणि शोजमध्ये काम केलंय. बिग बॉसमध्ये अली आणि त्याची गर्लफ्रेंड जास्मीन एकत्र सहभागी झाले होते. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.