अडाणी लोकं..; हिंदू गर्लफ्रेंडला बुरखा घालण्यास भाग पाडल्याची टीका, अभिनेता भडकला
गर्लफ्रेंड जास्मीन भसीनला बुरखा घालायला लावला, अशी टीका नेटकऱ्यांनी अभिनेता अली गोणीवर केली आहे. यावर आता अलीने प्रत्युत्तर दिलं आहे. अली आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत जास्मीन अबू धाबीला गेली होती. तेव्हाचा तिचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘ये है मोहब्बतें’, ‘खतरों के खिलाडी’, ‘बिग बॉस’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि शोजमध्ये झळकलेला अभिनेता अली गोणी त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. अली पंजाबी अभिनेत्री जास्मीन भसीनला डेट करतोय. या दोघांचं रिलेशनशिप जगजाहीर आहे. अली आणि जास्मीन यांच्या नात्यात धर्माची भिंत कधीच मधे आली नाही, परंतु सोशल मीडियावर अनेकदा धर्मावरून या दोघांना ट्रोल केलं जातं. नुकत्यात पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान ‘गणपती बाप्पा मोरया’ न म्हटल्याने अलीवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता. त्यावर अलीने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं होतं. त्यानंतर बुरखा घातलेला जास्मीनचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावरूनही अलीला ट्रोल करण्यात आलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अलीने जास्मीनच्या बुरख्यातील व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत अली म्हणाला, “सोशल मीडियावर जास्मीनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अबाया (बुरखा) घालून चालताना दिसतेय. तर ही अशिक्षित लोकं आहेत. मी त्यांचे विचार ऐकूनच हैराण झालोय. यासाठी ट्रॅव्हल करणं (प्रवास) खूप गरजेचं असतं. प्रवासादरम्यान लोकांना विविध अनुभव येतात, विविध गोष्टी पहायला मिळतात. हे खूप गरजेचं आहे. कारण या अडाणी लोकांना हे समजत नाहीये की तो अबू धाबीमधील व्हिडीओ आहे.”
View this post on Instagram
याविषयी तो पुढे म्हणतो, “अबू धाबीमधील ती शेख जायद मशीदमध्ये होती. तिथे जो कोणी जातो, त्याला अबाया घालूनच आत जावं लागतं. अन्यथा तुम्हाला आत प्रवेश मिळत नाही. हा अबू धाबीचा नियम आहे. तुम्ही अबाया न घालता तिथल्या मशिदीत प्रवेश करू शकत नाही. जास्मीन आणि माझी बहीण तिथे गेली होती. त्यांनाही अबायाशिवाय आत जाऊ दिलं नव्हतं. तेव्हा त्यांनी तिथून अबाया खरेदी केला आणि नंतर तो परिधान करून आत गेल्या. कारण ती अबू धाबी टूरिज्मला प्रमोट करण्यासाठी गेली होती. त्या व्हिडीओवरून लोकांनी ट्रोल केलं. मी तिला मशिदीत घेऊन गेलो आणि बुरखा घालायला लावला, असा अर्थ काढला गेला. यालाच अडाणीपणा म्हणतात. एका छोट्या गोष्टीला कुठे कुठे फिरवलं जातंय, तुम्हीच पहा. मी गणपती बाप्पा मोरया म्हटलं नाही म्हणून आता जास्मीनवरून ट्रोलिंग केली जातेय.”
“जास्मीन माझ्यासोबत गेल्या चार वर्षांपासून आहे आणि जर तिला आवडत नसेल तर मी कशाला तिला बळजबरी करेन? मी का म्हणेन की तू रोजा कर? तिची मर्जी, तिचा धर्म, तिला जे करायचंय ते ती करू शकते. मी का तिच्यावर जबरदस्ती करेन आणि ती माझ्यावर का करेल”, असं अलीने स्पष्ट केलं.
