कुराणात लिहिलंय, माझा धर्म..; ‘गणपती बाप्पा मोरया’ न म्हणण्यावर अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर
अभिनेता अली गोणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. यामध्ये त्याची गर्लफ्रेंड जास्मिन भसीन आणि मैत्रीण निया शर्मा 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करताना दिसले. परंतु अलीने तसं बोलणं टाळलं होतं. याबाबत आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री जास्मिन भसीन आणि तिचा बॉयफ्रेंड अली गोणी यांचा गणेशोत्सवादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये जास्मिन आणि तिची मैत्रीण निया शर्मा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत आनंदाने नाचताना दिसले. परंतु त्यांच्या बाजूलाच उभा असलेल्या अली गोणीने मात्र बाप्पाचा जयघोष केला नाही. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला खूप ट्रोल केलं. आता अलीने या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे ‘गणपती बाप्पा मोरया’ का म्हणाला नाही, यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.
‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत अली म्हणाला, “मी कुठे होतो, मी काहीतरी विचार करत होतो, मी काय करत होतो? या गोष्टीवरून इतका मोठा वाद निर्माण होईल, याकडे मी लक्षच दिलं नव्हतं. या देशात इतके रिकामटेकडे लोक आहेत, हे मला माहीत आहे. कारण इथे काय काय चालतंय हे मी पाहत असतो. सोशल मीडियावर मी एका मुलीचं पेज पाहिलं होतं. त्या पेजवरून माझी गर्लफ्रेंड जास्मिनला आणि आईला शिव्या दिल्या जात आहेत. एक मुलगीच दुसऱ्या मुलीविषयी असं बोलतेय. जर मला एखाद्या धर्माचा अपमान करायचा असला तर मी इतका तयार होऊन का गेलो असतो? मी पहिल्यांदाच अशा ठिकाणी गेलो होतो. कारण पूजेत काय केलं जातं, कसं केलं जातं, हे मला माहीत नाही. माझी काळजी हीच असते की माझ्याकडून कोणती चुकीची गोष्ट होऊ नये आणि त्याची खिल्ली उडवली जाऊ नये. म्हणूनच मी कधी कोणत्या पूजेला जात नाही. आम्ही पूजा वगैरे करत नाही. आमचा धर्म त्याची परवानगी देत नाही. परंतु कुराणमध्ये लिहिलंय की प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे आणि ते मी करतो.”
View this post on Instagram
“मी माझ्यात तंद्रीत होतो, त्यामुळे मी देवाचं नाव घेऊ शकलो नाही. मी याआधी कधीच गणेश पूजासुद्धा केली नव्हती. त्या गोष्टीचा असा अर्थ असा काढला जाईल, याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. जे लोक मला ओळखतात, ज्यांनी आधीपासून माझा प्रवास पाहिलाय, त्यांना माहीत आहे की मी सर्व धर्मांचा आदर करतो. माझ्या मनात प्रत्येक धर्माविषयी आदर आहे”, असं त्याने स्पष्ट केलं.
अली गोणी हा मुस्लीम अभिनेता असून त्याची गर्लफ्रेंड जास्मिन भसीन ही पंजाबी आहे. ‘बिग बॉस’मुळे ही जोडी लोकप्रिय झाली आणि गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
