
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अमाल मलिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या आई-वडील आणि भावासोबतचे सर्व संबंध तोडत असल्याचं जाहीर केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या ब्रेकअपविषयी खुलासा केला आहे. मी मुस्लीम असल्याने आणि फिल्म इंडस्ट्रीत काम करत असल्याने गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयांचा आमच्या नात्याला नकार होता, असं त्याने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे आई हिंदू सारस्वत ब्राह्मण असल्याचा खुलासा अमालने या मुलाखतीत केला आहे. अमाल आणि अरमान मलिक हे प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांचे पुतणे आहेत.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अमाल म्हणाला, “मी पहिल्यांदाच माझ्या रिलेशनशिपबद्दल बोलतोय. परंतु हीच योग्य वेळ आहे असं मला वाटतंय. ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील गाण्यांसाठी काम करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. कारण त्यावेळी मी अत्यंत वाईट काळाचा सामना करत होतो. ज्या मुलीसोबत मी रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करत होता आणि भावनिकदृष्ट्या मी खूप खचलो होतो.”
ब्रेकअपविषयी त्याने पुढे सांगितलं, “आम्ही 2014 ते 2019 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होतो. परंतु तिचे आईवडील माझ्या धर्म आणि करिअरच्या विरोधात होते. फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या व्यक्तीसोबत मुलीचं रिलेशनशिप त्यांना नामंजूर होतं. मी एके ठिकाणी परफॉर्म करणार होतो आणि तितक्यात तिचा फोन आला की, मी लग्न करतेय. तेव्हा मी जर तिच्याकडे गेलो असतो तर ती माझ्यासोबत पळून जाण्यास तयार होती. परंतु कदाचित तेव्हा माझ्यात ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’मधला शाहरुख आला होता. मी तिला म्हटलं की जर तुझे आईवडील माझ्या धर्माचा आणि करिअरचा स्वीकार करत नसतील, तर तुला ऑल द बेस्ट.”
“त्या ब्रेकअपने मी पूर्णपणे खचलो होतो. लोकांना वाटतं की मी मुस्लीम आहे. परंतु माझे वडील मुस्लीम आहेत आणि माझी आई सारस्वत ब्राह्मण हिंदू आहे. आम्ही देवावर विश्वास ठेवतो, परंतु देवाला घाबरत नाही. आमच्या घरात कोणीच कोणत्या धर्माबद्दल कट्टर नाही. मी स्वत:ला माऊंट मेरी चर्चमध्येही प्रार्थनेला जातो. माझ्या नात्यापेक्षा त्यांना माझ्या धर्माशी समस्या होती. ते जाट होते. ते मला म्हणाले की तुझी पार्श्वभूमी इस्लामची आहे. त्यावर मी त्यांना म्हणालो की माझ्यात, इस्लामचा I (आय) सुद्धा नाही. माझा कर्मावर विश्वास आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो. परंतु जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जे माझ्या धर्माबद्दल आणि कामाबद्दल इतका नकारात्मक विचार करतात, त्यांच्याशी मी जोडलो गेलो नाही, ते बरंच झालं. जरी आमचं लग्न झालं असतं तरी ते नातं फार काळ टिकू शकलं नसतं”, असं अरमानने स्पष्ट केलं.