‘गप्प राहणं शिकायला..’; मध्यरात्री अमिताभ बच्चन यांनी लिहिली अशी पोस्ट, संभ्रमात पडले चाहते

अभिनेते अमिताभ बच्चन हे एक्स (ट्विटर) अकाऊंटवर बरेच सक्रिय असतात. दररोज ते विविध पोस्ट त्यावर लिहित असतात. अशातच त्यांनी वाढदिवशी जी पोस्ट लिहिली आहे, ती वाचून चाहते संभ्रमात पडले आहेत. बिग बींना नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

गप्प राहणं शिकायला..; मध्यरात्री अमिताभ बच्चन यांनी लिहिली अशी पोस्ट, संभ्रमात पडले चाहते
Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 12, 2025 | 2:52 PM

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. ते 83 वर्षांचे झाले आहेत. वयाची ऐंशी पार केल्यानंतरही बिग बी सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. टेलिव्हिजनपासून मोठ्या पडद्यापर्यंत ते विविध प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. परंतु वाढदिवसाच्या रात्री अमिताभ बच्चन यांनी अशी काही पोस्ट लिहिली, ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्यांची ही पोस्ट वाचून चाहतेसुद्धा संभ्रमात पडले आहेत. बिग बींना या पोस्टमधून नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. अशा पद्धतीच्या पोस्टमुळे चर्चेत येण्याची बिग बींची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते त्यांच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चर्चेत होते.

10 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2.38 वाजता त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘बोलायला शिकण्यासाठी दोन वर्षे लागली आणि गप्प राहायला शिकण्यासाठी 80 वर्षे लागली.’ त्यानंतर वाढदिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.50 वाजता त्यांनी लिहिलं, ‘दिवस वेगाने सरतोय. मी शिकतोय, शिकलेलं ज्ञान विसरण्यासाठी.’ बिग बींनी पोस्ट केलेल्या या ओळी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिल्या होत्या. पोस्टमध्ये त्यांचं नाव लिहित अमिताभ बच्चन यांनी श्रेय दिलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमुळे चाहते गोंधळले आहेत. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट-

अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या शोचे ते सूत्रसंचालक आहेत. केबीसीच्या सेटवर खास पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जावेद अख्तर आणि फरहान अख्तर यांनी त्यांचा वाढदिवस आणखी खास बनवला. त्यानंतर त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेरही चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी असंख्य चाहते बंगल्याबाहेर जमले होते. तर चाहत्यांना भेटण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बिग बीसुद्धा बंगल्याबाहेर आले होते. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ते रजनीकांत यांच्यासोबत ‘वेट्टाय्यान’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकले होते. यानंतर ते ‘कल्की 2898 एडी’च्या सीक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.