आराध्याच्या वाढदिवसानिमित्त बिग बींची भावूक पोस्ट; म्हणाले ‘गमावण्याचं दु:ख..’

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून नात आराध्या बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या आता 14 वर्षांची झाली आहे.

आराध्याच्या वाढदिवसानिमित्त बिग बींची भावूक पोस्ट; म्हणाले गमावण्याचं दु:ख..
अमिताभ बच्चन, आराध्या बच्चन
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 17, 2025 | 12:00 PM

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या 14 वर्षांची झाली आहे. आराध्याच्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी खास ब्लॉग लिहित तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या ब्लॉगमध्ये त्यांनी गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या दु:खद घडामोडींबद्दलही भावना व्यक्त केल्या आहेत. ‘गेल्या काही दिवसांमध्ये ज्यांना आपण गमावलोय, त्याचं प्रचंड दु:ख आहे. परंतु आयुष्य हे पुढे जात राहतं आणि ते पुढे जात राहिलं पाहिजे’, असं त्यांनी म्हटलंय. अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. आराध्या ही सर्वांत लोकप्रिय स्टारकिड असून सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट-

बिग बींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘आराध्याच्या वाढदिवसानिमित्त तिला भरपूर आशीर्वाद आणि शुभेच्छा. आपल्यातील बाळ काळानुसार मोठं होतं आणि त्यांना आपण सर्वाधिक शुभेच्छा देतो. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो. आज आमच्यातील सर्वांत प्रेमळ व्यक्तीचा वाढदिवस आहे.’

या ब्लॉगमध्ये ते पुढे लिहितात, ‘गेल्या काही दिवसांमध्ये आपण अनेकांना गमावलंय. त्याचं प्रचंड दु:ख आहे. परंतु आयुष्य पुढे जात राहतं आणि ते पुढेच गेलं पाहिजे. जसजसं आयुष्य आणि वेळ पुढे जात असते, तसतशा आपल्या प्रार्थनाही सुरू असतात. आपण जगतो, अनुभवतो, टिकून राहतो, चिकाटीने झटतो आणि आयुष्यातील अडचणींवर मात करत पुढे चालत राहतो. हा आपला विचार आणि विश्वास आहे.’ या पोस्टच्या अखेरीस बिग बींनी लिहिलं, ‘..आणि शो चालत राहतो.’

अमिताभ बच्चन यांनी नुकतंच त्यांच्या ब्लॉगमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. गेल्या काही दिवसांत झरीन खान, गोवर्धन असरानी, पियुष पांडे, सतीश शाह यांसारख्या कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि प्रेम चोपडा यांना आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्यावर आता जुहू इथल्या निवासस्थानीच उपचार सुरू आहेत. धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी ते स्वत: कार चालवत गेले होते.