
शाहरुख खान. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, विराट कोहली यांच्यापाठोपाठ आता बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हेसुद्धा अलिबागकर झाले आहेत. त्यांनी अलिबागच्या मुनवली इथं सहा कोटी रुपयांना तीन विकसित भूखंड खरेदी केले आहेत. पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जाणारं अलिबाह गेल्या काही वर्षांत प्रमुख गुंतवणूक केंद्र झालं आहे. देशातील बडे उद्योजक, कलावंत आणि क्रिकेटपटू यांनाही अलिबागमध्ये गुंतवणुकीचा मोह आवरता आलेला नाही. शाहरुख खान, अक्षय खन्ना, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, विराट कोहली, अनुष्का शर्मा, राम कपूर, क्रिती सनॉन यांच्या पाठोपाठ आता बिग बींनीही अलिबागमध्ये विकसित भूखंड खरेदी केले आहेत.
अलिबाग तालुक्यातील मुनवली इथं त्यांनी 8 हजार 880 चौरस फुटांचे तीन विकसित भूखंड खरेदी केले आहेत. ज्याचं बाजारमूल्य 6 कोटी 59 लाख रुपये आहे. नुकतीच या खरेदी व्यवहाराची अलिबाग इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यासाठी 39 लाख 58 हजार रुपयांचा मुद्रांक शुल्क आणि 90 हजार रुपये नोंदणी शुल्क भरलं आहे. अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या भूखंडामध्ये 3 हजार 760 चौरस फूट, 2 हजार 580 चौरस फूट आणि 2 हजार 540 चौरस फूट अशा तीन भूखंडांचा समावेश आहे.
अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपला 83 वा वाढदिवस साजरा केला. दर रविवारी त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते ‘जलसा’ बंगल्याबाहेर जमा होतात. वाढदिवशी ही गर्दी आणखी वाढते. बिग बींनीही बंगल्याबाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केलं आणि त्यांना भेटवस्तू वाटल्या. वयाची ऐंशी पार केल्यानंतरही बिग बी सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. टेलिव्हिजनपासून मोठ्या पडद्यापर्यंत ते विविध प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.
अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या शोचे ते सूत्रसंचालक आहेत. केबीसीच्या सेटवर खास पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जावेद अख्तर आणि फरहान अख्तर यांनी त्यांचा वाढदिवस आणखी खास बनवला. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ते रजनीकांत यांच्यासोबत ‘वेट्टाय्यान’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकले होते. यानंतर ते ‘कल्की 2898 एडी’च्या सीक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.