मला क्लिनिकली डेड घोषित केलेलं…मृत्यूच्या दाढेतून परतलेला बॉलिवूडचा सुपरस्टार, बायकोनंही सोडलेली आशा, काय घडलेलं?
Bollywood Superstar : बॉलिवूडचा सुपरस्टार मृत्यूच्या दाढेतून परतलेला. अभिनेत्याच्या चाहत्यांनीही त्याच्यासाठी प्रार्थना केलेली. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

आज अमिताभ बच्चन यांचा ८४ वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. पण, एकदा अशी घटना घडलेली, ज्यामुळे अमिताभ यांचा जीव जाण्याची वेळ आली होती. ही बातमी पसरताच संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागला. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी अथक प्रयत्न केले. यादरम्यान, जया बच्चन त्यांच्या जवळच होत्या. अमिताभ बच्चन यांची प्रकृती जेव्हा अत्यंत गंभीर झाली होती, तेव्हाचा तो काळ किती भीतीदायक होता, याबद्दल त्यांनी नंतर अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं.
अमिताभ बच्चन यांचा झालेला अपघात
२६ जुलै १९८२ रोजी, बंगळुरू विद्यापीठात मनमोहन देसाई यांच्या ‘कुली’ चित्रपटासाठी अमिताभ एका ॲक्शन सीनचं शूटिंग करत होते, यात त्यांच्यासमोर अभिनेते पुनीत इस्सार होते. या सीनमध्ये त्यांना समोरच्या व्यक्तीचा पंच खाऊन टेबलावर कोसळायचं होतं आणि त्यानंतर स्टंट पुढे चालू ठेवायचा होता. ‘स्टंट डबल’ची मदत घेण्याऐवजी त्यांनी हा स्टंट स्वतःच करण्याचं ठरवलं होतं. मात्र, वेळेचा ताळमेळ चुकला आणि ते टेबलाच्या कोपऱ्यावर आदळले, ज्यामुळे त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. या अपघातामुळे त्यांचे आतडे फाटले आणि अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला. सुरुवातीला त्यांच्यावर बंगळुरूमध्ये उपचार करण्यात आले, परंतु प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सिमी गरेवालला दिलेल्या एका मुलाखतीत जया यांनी या घटनेबद्दल मनमोकळेपणानं सांगितलं. जया बच्चन म्हणाल्या की, शस्त्रक्रियेनंतर काही गुंतागुंत स्थिती निर्माण झाल्यामुळे अमिताभ यांचा रक्तदाब अत्यंत धोकादायक पातळीपर्यंत खाली आला होता आणि त्यांना पुन्हा सावरण्यासाठी डॉक्टरांना खूप प्रयत्न करावे लागत होते.
जया यांनी सांगितलं की, त्या हातात ‘हनुमान चालिसा’ धरून होत्या, पण डॉक्टर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी धावपळ करत असताना एकाग्रता साधणं त्यांना कठीण जात होतं. अशा परिस्थितीत, त्यांना अमिताभ यांच्या पायाच्या बोटाची हालचाल दिसली आणि त्या ओरडल्या, ‘त्यांनी हालचाल केली, त्यांनी हालचाल केली.’ डॉक्टरांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि हळूहळू अमिताभ प्रतिसाद देऊ लागले.
अमिताभ यांच्या प्रकृतीची बातमी लोकांपर्यंत पोहोचताच, संपूर्ण भारत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी एकवटला. चाहते रुग्णालयाबाहेर गर्दी करून उभे राहिले, काहींनी उपवास केले, अनवाणी पायांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केल्या आणि रात्रभर जागून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्या काळात ते यशाच्या शिखरावर होते, त्यामुळे त्यांचा हा संघर्ष केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण देशाची चिंता बनला होता. त्या संकटकाळात आपली अवस्था एखाद्या धूसर धुक्क्यात हरवल्यासारखी किंवा कोमाच्या अगदी जवळ पोहोचल्यासारखी झाली होती, असं अमिताभ यांनी सांगितलं आहे. तसंच, पुन्हा शुद्धीवर येण्यापूर्वी काही क्षणांसाठी आपण ‘क्लिनिकली डेड’ झालो होतो, असंही त्यांनी सांगितलं आहे. या अपघाताचा आणि त्याच्या उपचारांचा त्यांच्या आरोग्यावर अनेक वर्षे परिणाम होत राहिला.
‘कुली’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या अपघाताचा प्रसंग कायम ठेवला
‘कुली’ हा चित्रपट १९८३ मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. ज्या प्रसंगात अमिताभ यांना दुखापत झाली होती, तो भाग चित्रपटाच्या फायनल कटमध्ये तसाच ठेवण्यात आला होता. तसंच, अपघात नेमका कोणत्या क्षणी घडला हे दर्शवणारी एक विशेष टीपही चित्रपटात समाविष्ट करण्यात आली होती.
