धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच अनिल शर्मांची भावूक पोस्ट, त्या वाक्याने सर्वांनाच केलं भावूक, तुम्ही वाचून…

धर्मेंद्र यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशातच आता अनिल शर्मा यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच अनिल शर्मांची भावूक पोस्ट, त्या वाक्याने सर्वांनाच केलं भावूक, तुम्ही वाचून...
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 27, 2026 | 8:38 AM

Padam Awards 2026: नुकतेच केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2026 ची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक व्यक्तींना कलाकारांना पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर देओल कुटुंबासह संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत आनंद आणि भावनांचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मेंद्र यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीला मिळालेली ही मोठी पावती असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पद्मविभूषण जाहीर होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांचे अभिनंदन केले. त्यांच्या योगदानाला सलाम करत अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांची भावुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

अनिल शर्मा यांची भावुक प्रतिक्रिया

‘गदर’ आणि ‘गदर 2’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र यांना आठवण करून देणारी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनिल शर्मा यांनी 2007 साली धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांना घेऊन ‘अपने’ हा चित्रपट बनवला होता जो प्रचंड यशस्वी ठरला होता.

धर्मेंद्र यांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर अनिल शर्मा यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘@aapkadharam जी यांना पद्मविभूषण मिळाल्याबद्दल त्यांच्या सर्व चाहत्यांचे मनापासून अभिनंदन. काश, हा सन्मान त्यांना थोडा आधी मिळाला असता, जेव्हा ते स्वतः तो स्वीकारू शकले असते… तेव्हा त्यांचा आनंद शब्दांत मांडता आला नसता.’ त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असून अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेमा मालिनी यांनाही अभिमान

धर्मेंद्र यांना पद्मविभूषण जाहीर होताच खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची आनंदाची भावना सोशल मीडियावर स्पष्टपणे दिसून आली. त्यांनी पोस्ट करत लिहिले की, ‘धरम जी यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत सरकारने त्यांना पद्मविभूषण देण्याचा निर्णय घेतला याचा मला खूप अभिमान आहे.’ विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांना यापूर्वी 2012 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

धर्मेंद्र यांनी 1960 साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘बंदिनी’, ‘आई मिलन की बेला’ आणि ‘काजल’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या.