Ankita Lokhande and Vicky Jain: माझे कपडे, वॉशरुम पूर्णपणे रक्ताने माखलं..; अंकिताच्या पतीसोबत नेमकं काय घडलं?

Ankita Lokhande and Vicky Jain: गेल्या तीन दिवसांपासून अंकिता लोखंडेच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या हातावर 45 टाके पडले आहेत. नेमकं काय घडलं, याविषयीचा खुलासा त्याने आता केला आहे.

Ankita Lokhande and Vicky Jain: माझे कपडे, वॉशरुम पूर्णपणे रक्ताने माखलं..; अंकिताच्या पतीसोबत नेमकं काय घडलं?
Ankita Lokhande and Vicky Jain
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 15, 2025 | 9:45 AM

Ankita Lokhande and Vicky Jain: अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती आणि बिझनेसमन विकी जैनच्या हाताला अत्यंत गंभीर दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताला मोठी दुखापत झाली असून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विकीच्या हातात काचेचे असंख्य तुकडे रुतले गेल्याने डॉक्टरांना त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्याच्या उजव्या हातावर 45 टाके पडले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विकीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची पत्नी आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे त्याच्यासोबत असून त्याची विशेष काळजी घेतेय. “कोणीच आपलं आयुष्याला गृहित धरू नये”, असं त्याने या घटनेनंतर म्हटलंय.

शुक्रवारी संध्याकाळी विकीसोबत ही घटना घडली. याविषयी त्याने सांगितलं, “तो एक सर्वसामान्य दिवस होता. मी ताकाचा ग्लास उचलत असताना तो घसरला. त्यानंतर तो मी इतका जोरात धरला की तो ग्लास माझ्या हातातच तुटला. त्यामुळे माझ्या तळहाताला आणि मधल्या बोटाला गंभीर दुखापत झाली. माझ्यासोबत कधीच इतकं भयानक घडलं नव्हतं. माझे कपडे आणि वॉशरुम पूर्णपणे रक्ताने माखलेलं होतं. परंतु जर मी खंबीर राहिलो नाही तर अंकिता अधिक घाबरेल, याची मला जाणीव झाली. त्यामुळे रुग्णालयात जात असतानाही वाटेत मी चॅट-जीपीटीवर उपचार शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा अंकिता माझ्या बाजूला बसून रडत होती.”

“रुग्णालयात डॉक्टरांनी जखम तपासल्यानंतर सांगितलं की हातावर बऱ्याच खोलवर जखमा आहेत. त्याचप्रमाणे मधल्या बोटालाही गंभीर दुखापत झाली होती. यामुळे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करावी लागली. दोन तासांच्या सर्जरीनंतर हातावर 45 टाके पडले. माझ्या हातावरील प्लास्टर चार आठवडे तसंच राहील. त्यानंतर काही महिने थेरपीही घ्यावी लागेल. या संपूर्ण काळात अंकिताने माझी खूप साथ दिली. रुग्णालयात माझ्यासोबत असताना तिने घरातील सर्व गोष्टींची काळजी घेतली”, असं त्याने पुढे सांगितलं.

अंकिताने विकीसाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत तिने म्हटलंय, ‘माझा जोडीदार, तू नेहमी माझा हात धरून, माझ्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करून याची आठवण करून देतो की काही क्षण कितीही कठीण असले तरी प्रेमामुळे तुम्ही त्यातून सहज सावरू शकता. अगदी गंभीर परिस्थितीतही तू मस्करी करत, वातावरण हलकंफुलकं ठेवत मला शांत करण्याचा मार्ग शोधत होतास. लवकर बरा हो. जसं आपण एकमेकांना वचन दिलं होतं तसं प्रत्येक वादळातून, प्रत्येक लढाईतून आपण एकत्र जाऊ. कठीण आणि वाईट परिस्थितीचा एकत्र सामना करू.’